गणेश मंदार्थी, ऋतुपर्णा बिश्बास यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार जाहीर
By श्रीकिशन काळे | Published: November 8, 2024 06:53 PM2024-11-08T18:53:55+5:302024-11-08T18:57:06+5:30
सन २००४ पासून तन्वीरच्या स्मृतीमध्ये त्यांचे पालक दीपा व श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली
पुणे : कर्नाटकातील यक्षगान कलाकार गणेश मंदार्थी आणि प्रसिद्ध नाट्य - दूरचित्रवाणी कलाकार व पश्चिम बंगालमधील 'अमता परिचय' या थिएटर गृपच्या सह-संस्थापिका ऋतुपर्णा बिश्बास यांना यंदाचा प्रतिष्ठित तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. रुपवेध प्रतिष्ठान, पुणे आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार देण्यात येतो.
येत्या शनिवारी (दि.१६) सायंकाळी ४:३० वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणाऱ्या विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येतील. कर्नाटकातील नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघाचे प्रमुख के.व्ही. अक्षरा या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील, अशी माहिती महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सचिव राजेश देशमुख यांनी दिली.
रोख रुपये ५० हजार आणि मानपत्र असे तन्वीर नाट्यधर्मी पुरस्काराचे स्वरूप आहे. थिएटर अर्थात रंगभूमी या क्षेत्राला विशेष योगदान देणाऱ्या तरुण पिढीतील कलाकारांना दरवर्षी सदर पुरस्कार देण्यात येतो. सन २००४ पासून तन्वीरच्या स्मृतीमध्ये त्यांचे पालक दीपा व श्रीराम लागू यांनी या पुरस्काराची सुरुवात केली.
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील गणेश मुख्यतः यक्षगान कलाकार आहे. उडुपी जिल्ह्यातील यक्षगान संस्थेत त्यांनी सुमारे दोन वर्षे काम केले. गणेशने २०१० मध्ये नीळकंठेश्वर नाट्यसेवा संघामधून पदवी प्राप्त केली. गणेश कर्नाटक राज्यात रंगभूमी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे.
ऋतुपर्णाने सिलीगुडी थिएटर अकादमीमध्ये १३ व्या वर्षी तिचा रंगभूमीवरील प्रवास सुरू केला. तिने आघाडीच्या ईटीव्ही बांग्ला टीव्ही मालिकांमध्ये काम केले आणि अभिनयात प्राविण्य मिळवून तिने नाटकात एमए पूर्ण केले. ती आणि तिचे पती थिएटरला शाळा आणि गावांमध्ये घेऊन जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत.