Ganesh Visarjan 2018 : आवाज वाढव डी जे...होऊ दे गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 06:39 PM2018-09-23T18:39:15+5:302018-09-23T18:41:11+5:30
उच्च न्यायालयाने डी जे ला बंदी घातली असताना पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कायदा पायदळी तुडवत, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता डी जे चा दणदणाट केला.
पुणे : उच्च न्यायालयाने डी जे ला बंदी घातली असताना पुण्यातील अनेक गणेश मंडळांनी कायदा पायदळी तुडवत, न्यायालयाच्या आदेशाला न जुमानता डी जे चा दणदणाट केला. उडत्या चालीच्या गाण्यांवर ठेका धरत विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे या मंडळांवर पोलीस कारवाई करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
उच्च न्यायालयाने डी जे वर बंदी घातली आहे. डी जे चे दुष्परिणाम मोठ्याप्रमाणावर समोर आल्याने हा निर्णय देण्यात आला होता. पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषद घेत मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन केले होते. मानाच्या गणपतींच्या समोर पारंपरिक पद्धतीने ढोलताशा वादन करण्यात आले, परंतु शहरातील अनेक मंडळांनी डी जे चा दणदणाट करत मिरवणुका काढल्या. 70 डेसीबल ची मर्याद असताना, कानठळ्या बसतील इतक्या जोरात डी जे लावण्यात आला होता.
यापुढे जात लहानग्यांना साऊंड च्या भिंतींसमोर उभे करण्यात आले होते. त्याचबरोबर ट्रॅक्टर वर उभे राहून ताल धरण्यात येत होता. या आधी चंदननगर तसेच वडगावशेरी येथे डी जे लावल्याने अनेक गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पोलीस आजही गुन्हे दाखल करणार का, असा प्रश्न विचारला जात आहे