Ganesh Visarjan: विश्वस्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीचा विसर्जन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 08:56 PM2021-09-19T20:56:24+5:302021-09-19T20:57:14+5:30
Shrimant Dagdusheth Halwai: मंगलमूर्ती मोरया... दगडूशेठ मोरया... जय गणेश... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या अखंड जयघोषात 'दगडूशेठ' च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले.
पुणे : मंगलमूर्ती मोरया... दगडूशेठ मोरया... जय गणेश... गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... च्या अखंड जयघोषात 'दगडूशेठ' च्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या विहिरीची प्रतिकृती असलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. विविधरंगी फुलांनी सजविलेल्या गणेश कुंडात रविवारी अनंत चतुर्दशीला तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळी सायंकाळी ६ वाजून ३६ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२९ व्या वर्षी उत्सवात सलग दुस-या वर्षी श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
रविवारी सायंकाळी ५.२० वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. मंदिरामध्येच साकारण्यात आलेल्या गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा आॅनलाईन पद्धतीने अनुभविला. लस घेऊन कोरोनाला हद्दपार करू या... असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिराबाहेर काढण्यात आली.
अशोक गोडसे म्हणाले, नागरिक घराबाहेर न पडल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यास मोठी मदत झाली आहे. श्रीं च्या विसर्जनासोबत कोरोनाचेही विसर्जन होण्यास हातभार लागला आहे. तसेच आॅनलाईन पद्धतीने कोटयवधी भाविकांनी दर्शन घेतले आहे, असेही त्यांनी सांगितले.