विसर्जन मिरवणूक : पुण्यातील मानाचे गणपती टिळक चौकात दाखल होण्यास सुरुवात, कसबा आणि तांबडी जोगेश्वरीचे आगमन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 04:11 PM2019-09-12T16:11:55+5:302019-09-12T16:12:07+5:30
अवघ्या दीड किलोमीटरचे अंतर कापण्यास लागले सुमारे 5 तास..
पुणे : पुण्याच्या गणेश उत्सव वैभवात मनाचे स्थान असलेल्या मानाच्या गणपतींची मिरवणूक सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरुवात झाली. रंगावलीच्या नयनरम्य पायघड्या...आकर्षक रंगावली, ढोलताशांचा गगनभेदी निनाद आणि पुणेकरांच्या जल्लोषपूर्ण गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणूक संथ गतीने पुढे सरकत होती. त्यामुळे टिळक चौकात दाखल होण्यास कसबा गणपतीला तीन १० मिनिट आणि तांबडी जोगेश्वरीला सुमारे पावणेचार वाजले.यादरम्यान पावसाच्या हलक्या शिडकाव्याने गणरायावर वर्षासरींची उधळण केली.
शहरातील मानाच्या गणपतीच्या मिरवणूकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीचा ' 'श्रीगणेशा' करण्यात आला. भाजप शहराध्यक्ष माधुरीताई मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक प्रसन्न जगताप, महेश लडकत, आदित्य माळावे, राजेश येनपुरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, मनीषा लडकत, रिपाईचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होत्या. तसेच उप महापौर सिध्दार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकीशोर राम कसबा गणपतीला हार घालून 'श्रीं' चे दर्शन घेतले.
रस्त्याच्या दुतर्फा पुणेकरांनी मानाच्या गणपतींची मिरवणूक पाहण्यास गर्दी केली होती. प्रत्येकजण आपल्या कुटुंबांसह मिरवणूक पाहण्यास आले होते. मानाचा पहिला कसबा गणपती दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी टिळक चौकातून महापौर मुक्ता टिळक, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारून विसर्जनासाठी रवाना झाला. अवघ्या दीड किलोमीटरचे अंतर कापण्यास लागले सुमारे 5 तास..