गणपती बाप्पा मोरया.., मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने 'दगडूशेठ' चा गणेशजन्म सोहळा संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 01:53 PM2022-02-04T13:53:17+5:302022-02-04T13:54:23+5:30
मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला
पुणे : पार्वतीच्या उदरी गणेश जन्मला...बाळा जो जो रे... च्या मंगल स्वरांत पाळणा म्हणत महिलांनी गणेशजन्म सोहळ्यात सहभाग घेत गणेशाचरणी प्रार्थना केली. गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया च्या निनादाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात दुपारी १२ वाजता दगडूशेठ गणपतीमंदिरात मोठ्या उत्साहात गणेशजन्म सोहळा संपन्न झाला. मंदिरावर केलेली कामधेनू प्रतिमांची आणि विविधरंगी फुलांची आकर्षक आरास अशा मनोहारी सजावटीने मंदिर परिसर अधिकच खुलला. गणेशभक्तांनी बाप्पाचे दर्शन घेत आरोग्यसंपन्न भारताकरीता गणेशचरणी प्रार्थना केली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने माघ शुद्ध चतुर्थीला विनायक अवतार असलेला गणेश जन्म सोहळा बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
शुक्रवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत प्रख्यात गायक अवधूत गांधी यांनी श्रीं चरणी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. स्वराभिषेकातून हरिनामाचा गजर, अभंग, भजन, गोंधळातील गण, शाहिरी गण, गोंधळ, गवळण, जुगलबंदी आणि भैरवी या विविध प्रकारची गीते ऐकण्याची संधी पुणेकरांना यानिमित्ताने मिळाली. सकाळी ८ ते ११ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत गणेश याग होणार आहे.
नगरप्रदक्षिणा सायंकाळी ६.३० वाजता दगडूशेठ गणपती मंदिरापासून लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरापर्यंत चांदीच्या पालखीतून काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजता श्रीगणेशाची मंगलआरती होईल.