गणेशोत्सवामध्ये होणार स्वच्छतेचा जागर
By admin | Published: August 27, 2014 05:05 AM2014-08-27T05:05:35+5:302014-08-27T05:05:35+5:30
गणेशोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून शहरात ३१ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुणे : गणेशोत्सवासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी महापालिकेकडून शहरात ३१ ठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय या दहा दिवसांच्या कालावधीत शहराच्या मध्यवर्ती पेठांमधील सर्व सशुल्क स्वच्छतागृहे नागरिकांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासनाकडून उपलब्ध मोबाईल टॉयलेटमध्ये प्रामुख्याने महिलांसाठीची स्वच्छतागृहे मोठ्या प्रमाणात असणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी दिली.
वैभवशाली गणेशोत्सवाची परंपरा असलेल्या गणेशोत्सवासाठी शहरात देश-विदेश, तसेच राज्यभरातील भाविक पुण्यात येतात. विशेषत: गणेश विसर्जनाच्या दिवशी उपनगरांसह जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यात महिलांचेही प्रमाण मोठे असते. या कालावधीत शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली सार्वजनिक स्वच्छतागृहे कमी पडतात. त्यामुळे महापालिकेकडून मागील वर्षी प्रमाणेच यंदाही मोबाईल टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात
येणार आहे. ही टॉयलेट प्रामुख्याने घोले रस्ता, औंध, तसेच कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांनी सुचविलेल्या प्रमुख ३१ ठिकाणी बसविली जाणार आहेत. (प्रतिनिधी)