पुराने आलेल्या मातीपासून बनवली गणेशमूर्ती; केळकर रस्त्यावरील ‘माती गणपती’ ची ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 01:07 PM2022-08-28T13:07:43+5:302022-08-28T13:12:11+5:30
सध्याचे मंदिर पाहतो १९९८ मध्ये जीर्णोद्धारीत केलेले आहे
पुणे : पूर आला तेव्हा नदीकाठी नारायण पेठेत खूप माती जमा झाली होती. त्या मातीत गुरे चारणारी मुले खेळत होती. त्यांनी त्या मातीपासून एक गणेशमूर्ती तयार केली. तीच मूर्ती पुढे ‘माती गणपती’ म्हणून ओळखली जाऊ लागली. श्री मोरया गोसावी यांनी तेव्हा त्या मुलांना मोठी मूर्ती करून तिला विसर्जित करू नका, असे सांगितले होते. तेव्हापासून या गणरायाला माती गणपती म्हणून ओळखले जाऊ लागले.
नारायण पेठेत न. चिं. केळकर रस्त्यावर हे गणपतीचे मंदिर आहे. पेशवाईत या मंदिराचे उल्लेख मिळतात. सवाई माधवराव यांच्या जन्मानिमित्त व दुसऱ्या बाजीरावाने पुत्रप्राप्तीबद्दल येथे दक्षिणा ठेवली होती. या मंदिराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते, त्यातच मंदिराचे नाव ‘माती’ का झाले असावे हे समजते, अशी माहिती इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक व स्वप्निल नहार यांनी दिली.
या भागात पूर्वी दाट झाडी होती. गुराखी येथे गायी, म्हशींना चरायला आणत असत. ते या ठिकाणी विश्रांतीला बसत आणि बसल्या बसल्या मातीच्या गणपतीमूर्ती बनवीत व नंतर मोडून टाकत. एक दिवस चिंचवडचे प्रसिद्ध मोरया गोसावी काशी यात्रेहून परतत असताना त्यांनी गुराख्यांचा मूर्ती बनविण्याचा व तोडण्याचा प्रकार पाहिला. त्यांनी गुराख्यांना उपदेश दिला की देवाच्या मूर्तीशी असे खेळू नये. तिची पूजा करीत जा. हा उपदेश गुराख्यांना पटला. त्यांनी मातीची मोठी मूर्ती बनविली. तिची पूजाअर्चा करू लागले. यामुळे ‘माती गणपती’ हे नाव झाले.
डाव्या सोंडेची चतुर्भुज मोठी गणेशमूर्ती येथे आहे. मंदिरास सभामंडप आहे. तिथे शिवपिंड व विष्णू-लक्ष्मी दिसतात. पानशेत पुराचा फटका मूर्तीस बसला नाही. सध्याचे आपण जे मंदिर पाहतो ते १९९८ मध्ये जीर्णोद्धारीत केलेले आहे. ईशान नावाच्या इमारतीत हे मंदिर दिसते. मंदिरासमोर जुनी दीपमाळ पाहायला मिळते. हे मंदिर श्रोत्री यांच्या खासगी मालकीचे आहे.