गणेशोत्सव - २०१९ : प्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिर देखाव्यात विराजमान होणार श्रीमंत दगडूशेठ गणपती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2019 12:19 PM2019-08-30T12:19:09+5:302019-08-30T12:31:56+5:30
श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या १२७ व्या वर्षानिमित्त श्री गणेश सूर्यमंदिर साकारले आहे. श्री गणेश सूर्यमंदिर ओडिशा राज्यातील विश्वप्रसिद्ध प्राचीन आश्चर्य ठरलेल्या कोणार्कच्या सूर्यमंदिरावर आधारित आहे. गणेश चतुर्थीला २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी ७ वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल.
सोमवारी (दि.२) प्राणप्रतिष्ठेपूर्वी सकाळी ८.३० वाजता मुख्य मंदिरापासून शेषात्मज रथातून श्रींची आगमन मिरवणूक काढणार आहे. फुलांनी साकारलेले २१ नाग रथावर लावणार आहेत. सुभाष सरपाले यांनी ही सजावट केली आहे. दुपारी १२.२० पर्यंत प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम होणार असून भाविकांनी दुपारी १२.३० नंतर श्रींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे केले आहे.
३ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता ॠषिपंचमीनिमित्त २५ हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. सकाळी ९ वाजता गणेशयागाचा शुभारंभ गुरुवर्य योगिराज भाऊमहाराज परांडे यांच्या हस्ते होणार आहे. रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत हरी जागरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. ४ सप्टेंबर रोजी सूर्यनमस्कार व ५ सप्टेंबर रोजी अग्निहोत्र यांसह उत्सवात वेदपठण, महिला हळदी-कुंकू असे कार्यक्रम होणार आहेत.
दररोज पहाटे ५ वाजल्यापासून महाअभिषेक पूजा होणार असून सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते सायंकाळी ६ यावेळेत मिलिंद राहुरकर शास्त्री व दुपारी १२ ते ४ यावेळेत दाक्षिणात्य पद्धतीने नटराजशास्त्री यांच्या उपस्थितीत गणेशयाग होणार आहे. दिनांक ३ ते ११ सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे ५ ते ६ यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ ते ५ यावेळेत मंत्र जागर होणार आहे. अनंत चतुर्दशीला १२ सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री विकटविनायक रथातून निघणार आहे.
...........
श्री गणेश सूर्यमंदिराचे वैशिष्ट्य
४यंदाच्या मंदिराच्या प्रतिकृतीची साकारण्यात येणारी संकल्पना भारताच्या प्राचीन वेद, पुराणे, शास्त्रे यावर आधारित आहे. उंच शिखरे, मंडप असलेले हे सूर्यमंदिर आहे. गेली अनेक वर्षे विविध मंदिरांची उत्कृष्ट प्रतिकृती सजावटीतून साकारण्याकरीता ट्रस्ट प्रयत्नशील आहे.
४सूर्याच्या प्रभात, माध्यान्य व सायंकालीन अवस्थांचे मनोहारी दर्शन तसेच १२ आदित्य आणि सूर्यास प्रिय असलेल्या कमल, पुंडरिक व उत्पालांच्या लता-वेलींच्या डौलदार नक्षींनी व्यापलेले मंदिर भाविकांना यंदा पाहता येणार आहे. अनेक स्तंभ, मालांची तोरणे आणि सिंह, कीर्तिमुख, हंस, यक्ष, सुरसुंदरी व आकाशगामी गंधर्वांनी मंदिर सजवले जाणार आहे.
...........
ाणेशभक्तांसाठी ५० कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल १५० कॅमेºयांचा वॉच
१ पुणे शहर मनपा, पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कँन्टोमेंट बोर्ड हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल ५० कोटींचा विमा ट्रस्टतर्फे काढला आहे. यामध्ये चेंगराचेंगरी, अतिरेकी हल्ला वा हवाई हल्ला झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. गणेशाचे कायमस्वरूपी मंदिर व मंदिरापासून १ किमीच्या परिसरातील भाविकांसाठीच हा विमा असणार आहे.
२ सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. तब्बल १५० कॅमेºयांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २०० पुरुष व महिला यांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.