राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले : डॉ.सदानंद मोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:13 AM2021-09-24T04:13:51+5:302021-09-24T04:13:51+5:30
पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ...
पुणे : ब्रिटिश राजवट आल्यानंतर लोकमान्य टिळक हे भारताचे पहिले नेते म्हणून ओळखले गेले. त्यांच्यापूर्वी अनेक नेते होते. परंतु ते ठरावीक भागापुरते मर्यादित होते. स्वातंत्र चळवळ उभी करताना उत्सवाचा उपयोग करता येईल, ही कल्पना त्यांना सुचली आणि गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. याच गणेशोत्सवातून स्वराज्याची प्रेरणा सामान्यांना मिळाली असून, राष्ट्राभिमान जागविण्याचे काम गणेशोत्सवाने केले, असे मत संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
पार्वती चव्हाण सोशल फाउंडेशन आणि साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठ यांच्यातर्फे बाजीराव रस्त्यावरील वरदश्री सभागृह येथे विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, निवृत्त पोलीस अधिकारी मारुतीराव देशमुख, फाउंडेशनचे संस्थापक गणेश चव्हाण, पीयुष शाह, नितीन यंदे, अमर राव, भोला वांजळे, नरेंद्र व्यास आदी उपस्थित होते.
गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी स्थिर पाण्याचे हौद तसेच फिरत्या हौदांची तसेच निर्माल्य संकलनाची व्यवस्था करणाऱ्या आठ गणेशोत्सव मंडळांना विघ्नहर्ता कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला. अष्टविनायक मित्र मंडळ विश्रांतवाडी, वाघजाई मित्र मंडळ फाउंडेशन जनता वसाहत, हिंदमाता तरुण मंडळ नाना पेठ, देशप्रेमी मित्र मंडळ कोथरूड, युगंधर मित्र मंडळ आनंदनगर, श्री रास्ता पेठ सार्वजनिक नायडू गणपती मंडळ, वंदे मातरम् मित्र मंडळ कसबा पेठ आणि गवळीवाडा श्री अरण्येश्वर मित्र मंडळ सहकार नगर या मंडळांचा उपरणे, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
गार्गी कोळपकर हिने गणेशवंदना नृत्य सादर केले. पीयुष शाह यांनी प्रास्ताविक केले. विद्या यंदे यांनी सूत्रसंचालन केले.