‘‘शांताबाई’’ फेम संजय लोंढे यांना गणेशोत्सव मंडळाचा मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:22+5:302021-04-30T04:14:22+5:30
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टने नाना पेठेतील राजेवाडी परिसरात राहणाऱ्या शांताबाई फेम संजय लोंढे यांच्या कुटुंबाला धान्य व ...
शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टने नाना पेठेतील राजेवाडी परिसरात राहणाऱ्या शांताबाई फेम संजय लोंढे यांच्या कुटुंबाला धान्य व जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, मंडळाचे ---- शिरीष मोहिते, मंडळाचे अध्यक्ष रवींद्र बरिदे, अमर लांडे, विक्रांत मोहिते, उमेश कांबळे, रवी धायगावे, राजाभाऊ कांचन, अनुप थोपटे, साहिल करपे, गणेश सांगळे, अमेय थोपटे आदी उपस्थित होते.
सतिश गोवेकर म्हणाले, कोरोनामुळे लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांसह सामाजिक संस्थानी देखील कलाकारांना मदत करायला हवी. प्रत्येक मंडळ किंवा संस्थेने एका कलाकाराची जबाबदारी घेतल्यास त्यांना मोठी मदत होणार आहे.
शिरीष मोहिते म्हणाले, सेवा मित्र मंडळातर्फे कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना भोजनाची मोफत सोय केली आहे. त्याची वृत्तपत्रात आलेली बातमी वाचून संजय लोंढे यांचा आम्हाला मदतीसाठी फोन आला. संजय लोंढे यांच्या भावाचे कोरोनामुळे नुकतेच निधन झाले. त्यांच्या दहाव्याचे विधी करण्याकरीता देखील आमच्याकडे पैसे नाहीत, काही मदत मिळेल का, असा विचारणा मंडळाकडे लोंढे यांनी केली. त्यावर मंडळाने आर्थिक मदत तर दिलीच, परंतु त्यांना धान्य व जीवनावश्यक वस्तूदेखील दिल्या आहेत.
संजय लोंढे म्हणाले, मागील वर्षापासून रेकॉर्डिंग किंवा स्टेज शो चे एकही काम आलेले नाही. त्यामुळे माझ्यासारख्या व अनेक छोट्या-मोठ्या कलाकारांवर आणि कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. कलाकार काम करण्यास तयार असले तरी देखील काम मिळत नाही. त्यामुळे जगावे कसे आणि कुटुंबाला कसे जगवावे, असा प्रश्न आम्हाला पडला आहे. शासनाने देखील आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.