गणेशोत्सवातील खड्डेमुक्ती कागदावरच
By admin | Published: August 31, 2016 01:39 AM2016-08-31T01:39:10+5:302016-08-31T01:39:10+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून खड्डेविरहित मंडपांची उभारणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास
पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांकडून खड्डेविरहित मंडपांची उभारणी करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले असतानाही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास रस्त्यांवर खड्डे खणून मंडप उभारले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. सिमेंट-काँक्रीटच्या रस्त्यावर खड्डे खणण्यास सक्त मनाई असताना त्या रस्त्यांवरही खड्डे खोदण्यात आल्याचे चित्र शहरात दिसत आहे. मंडप धोरणानुसार रस्त्यावर खड्डा खणल्यास प्रतिखड्डा २ हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
उच्च न्यायालयाने सार्वजनिक उत्सवांकरिता एक मंडप धोरण तयार करण्याचे निर्देश मागील वर्षी सर्व महापालिकांना दिले होते. त्यानुसार पुणे महापालिकेने रस्त्यात मंडप टाकण्याबाबतची नियमावली तयार करून तिला मुख्य सभेची मंजुरी घेतली. त्यानंतर ही नियमावली उच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
तक्रारी करता येणार
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सार्वजनिक उत्सवाच्या वेळी वाहतुकीला अडथळा होईल अशा मंडपांची उभारणी, खड्डे खणणे, ध्वनिप्रदूषण यांबाबत नागरिकांना पालिकेकडे तक्रारी करता येऊ शकणार आहेत. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे नागरिक तक्रारी करू शकतात.
विविध उत्सवांकरिता मंडप उभारताना संपूर्ण रस्ता अडविला जाऊ नये. रस्त्यामध्ये खड्डे खणून मंडप टाकू नये, मंडपांची उंची ४० फुटांपेक्षा जास्त नसावी, अधिक रहदारी असलेल्या हॉस्पिटल, कॉलेज, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसरात मंडपांना परवानगी देऊ नये असे मंडप धोरणाच्या अटी-शर्तींमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तरीही, या नियमांचे मंडळांकडून सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.