गेम वाजवण्यासाठी गेले आणि गजाआड झाले ; उपद्रवी टोळक्याला अखेर अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 09:21 PM2019-08-21T21:21:12+5:302019-08-21T21:26:55+5:30
सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर व समर्थ नगर परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी व कोयते घेऊन वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती .
पुणे : सिंहगड रस्त्यावरील तुकाई नगर व समर्थ नगर परिसरात मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास एका टोळक्याने हातात नंग्या तलवारी व कोयते घेऊन वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करून दहशत माजवली होती .या तोडफोड करणाऱ्या व दहशत पसविणाऱ्या तेरा जणांना हडपसरमधून अवघ्या पाच तासात सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक करून त्यांना आज बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सुंदर रामचंद्र शर्मा (वय १९) विक्रम प्रमोद पवार (वय १९) लक्ष्मीकांत रमेश देसाई (वय १९) साहिल उर्फ परवेज हैदरअली इनामदार ( वय १८) सुमित राजकुमार सुरवसे (वय २०) प्रसाद सोपान बांदल (वय २३) अनिकेत राजु वायदंडे (वय १९) प्रफुल्ल भारत कांबळे (वय १९) अक्षय युवराज ठाकरे (वय २४ ) ऋतिक सुदाम इंगोले (वय १९ ) सनी उर्फ गिरीष महेंद्र हिवाळे (वय २०) सर्व रा .काळे पडळ, हडपसर,पुणे ह्या अकरा आरोपीना अटक केली असून दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत.
सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री एका टोळक्याने टेम्पो,कार, ट्रक,रिक्षा, मोटारसायकल आदी वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड करीत येथील सुधाकर विठ्ठल भजनावळे यांच्या घरात घुसून टीव्ही, फ्रिज, पंखे, इत्यादी साहित्यांची मोडतोड केली. तसेच, तुकाईनगर येथील रब्बानी सय्यद यांच्या किराणा दुकानात घुसून काउंटर व आतील समानांची मोडतोड केली. तुकाईनगरमधील गल्लीमधील पार्किंगमध्ये पार्क केलेल्या बऱ्याच मोटारसायकलीचेही नुकसान केले आहे. परिसरात या टोळक्याने रस्त्यावर उभी असलेली रिक्षा,टेम्पो,दुचाकी, स्कार्पिओ, कार, मारुती व्हॅन,ट्रक ,टेम्पो,आदी वीस ते पंचवीस वाहनांच्या काचा फोडुन कोयत्याने व तलवारीने मोडतोड करून परिसरात दहशत माजवुन मोठे नुकसान केले. या टोळक्यांच्या हल्ल्यात समीर अलिफ शेख (१८वर्षे ),सुधाकर विठ्ठल भजनावळे (४८ वर्षे )व बाळकृष्ण तुकाराम राऊत (३४ वर्षे ) जखमी झाले आहेत.
बंटी पवारचा गेम वाजवण्यासाठी हडपसरमधून आले होते टोळके
मोक्का अंतर्गत कारवाई केलेला सराईत गुन्हेगार बंटी पवार सुटल्यानंतर १९ ऑगस्ट रोजी बंटी पवार याच्या साथीदारांनी त्याच्या सांगण्यावरून चेतन ढेबे याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता, अशी तक्रार चेतन पांडुरंग ढेबे व राहुल महादेव वायबसे (रा. तुकाई नगर, वडगाव बुद्रुक ,पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र झालेला हल्ल्याचा राग मनात धरून चेतन ढेबे याने हडपसरमध्ये राहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांशी संपर्क करून बंटी पवारचा गेम वाजवण्यासाठी त्यानेच हडपसर येथुन हे टोळके आणले होते. मात्र नेमका याच वेळी बंटी पवार हा चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर असल्यामुळे या गेम मधुन तो वाचला. परंतु टोळक्यांना बंटी पवार न सापडल्यामुळे याचा राग येऊन तो राहत असलेल्या परिसरातील वाहनांची तोडफोड या टोळक्याने केली.