रोहित्रामधील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:54+5:302021-06-19T04:07:54+5:30
आव्हाळवाडी : कोलवडी, बकोरी, फुलगाव परिसरात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी लोणी कंद ...
आव्हाळवाडी : कोलवडी, बकोरी, फुलगाव परिसरात विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करणारी टोळी लोणी कंद शहर तपास पथकाने पकडली आहे. त्यांचेकडून पाच लाख अडतीस हजार पाचशे रुपये किमतीचे सातशे किलो तांबे धातूचा माल हस्तगत केला असून एकूण दहा रोहित्र चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. चार आरोपींसह चोरीचा माल घेणाऱ्या भंगार दुकानदारास अटक करण्यात आली आहे.
मुकेश प्रल्हाद पटेल (वय १९), अली तसब्बर खान (वय १९), अल्ताफ अन्वर (वय २३), हरिगोबिंद तुळशीराम चौधरी (वय २३, सर्व रा. वेळू, ता. भोर, मूळगाव उत्तर प्रदेश) या चार आरोपींसह भंगार दुकानदार धीरज अशोक जैन (रा. कात्रज)याला अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी कंद पोलीस स्टेशन हद्दीत लोणी कंद तपास पथक गस्तीवर असताना तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे व पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना गोपनीय बातमीदाराकडून रोहित्रामधील तांब्याच्या तारांची चोरी करणारे चार इसम हे लोणी कंद येथील पावर हाउस जवळील विद्युत ट्रान्सफॉर्मरलगत आळंदी रोड येथे थांबले असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच तपास पथकाने चारही संशयितांना ताब्यात घेतले. सखोल चौकशी करून त्यांचेकडे असलेल्या दुचाकीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये हातोडे, छन्नी, स्क्रू ड्रायव्हर, एक्सा ब्लेड, कटर, विविध स्पॅनर असे मोठ्या प्रमाणावर साहित्य आढळून आले. चौकशी दरम्यान कोलवडी, बकोरी, फुलगावसह सासवड, राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रोहित्रांची चोरी केली असल्याची आरोपींनी कबुली दिली.
दहा गुन्हे केल्याचे निष्पन्न
लोणी कंद शहर पोलीस हद्दीमधील बकोरी, कोलवडी, फुलगाव येथे ७ गुन्हे, सासवड पोलीस स्टेशन हद्दीत १ व राजगड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये २ असे एकूण १० गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून ७०० किलो तांबा धातू ५ लाख ३८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल कात्रज येथील भंगारच्या दुकानामधून जप्त केला आहे. तपास लोणी कंद शहर पोलीस करत आहेत.
सदर कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त चव्हाण, परिमंडळ-४ चे पोलीस उपआयुक्त पंकज देशमुख, सहा. पोलीस आयुक्त जाधव, लोणी कंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक वेताळ यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक सुरज गोरे, सहा. फौजदार मोहन वाळके, पो. ना. कैलास साळुके, पो. ना. विनायक साळवे, पो. ना. अजित फरांदे, पोलीस अंमलदार समीर पिलाणे, सागर कडू, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.
तांब्याच्या तारांच्या चोरीतील पकडण्यात आलेल्या आरोपींसह वरिष्ठ पोलीस अधिकारी व तपास पथक.