अट्टल दरोडेखोरांची टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:09 AM2021-01-09T04:09:08+5:302021-01-09T04:09:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नारायणगाव / आळेफाटा : पुणे व अहमदनगर जिल्ह्याटत दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दोन दरोडेखोरांना जेरबंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव / आळेफाटा : पुणे व अहमदनगर जिल्ह्याटत दरोडे टाकून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल दोन दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. या दरोडेखोरांनी साथीदारांच्या मदतीने पुणे जिल्ह्यात चार दरोडे टाकले आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली .
विशाल ऊर्फ कोंग्या नरेश काळे (वय २६) व दीपक ऊर्फ आशिक आझाद काळे (वय २५, दोघे रा. निघोज ता. पारनेर जि.अ. नगर) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत.
आळेफाटा पोलीस ठाण्यात १४ डिसेंबर २० रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्यातील आरोपींचा त्वरित शोध घेण्याचे आदेश पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिले होते. त्यानुसार आळेफाटा, पारनेर, निघोज, साकोरी या भागांत शोध सुरू केला. दरम्यान शिरूर तालुक्यात २०१९ रोजी झालेल्या दरोड्यातील आरोपी विशाल ऊर्फ कोंग्या काळे हा टाकळी हाजी परिसरात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना खबऱ्यांमार्फत मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, हवालदार विक्रम तापकीर, काशीनाथ राजापुरे, नाईक दिपक साबळे, अजित भुजबळ, मंगेश थीगळे, शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर या पथकाने निघोज रस्त्यावर सापळा लावला. यावेळी वरील दोन आरोपी आले. मात्र, त्यांना पोलिसांचा संशय आल्याने त्यांनी पळन्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली.
त्यांची चौकशी केली असता गेल्या चार-पाच महिन्यांत ओतूर, आळेफाटा, मंचर, लोणी कंद, पारनेर या भागांत त्यांचे इतर साथीदारांसोबत गुन्हे केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दरोडेखोरांनी आळेफाटा हद्दीत दोन दरोडे, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा, लोणी कंद पोलीस ठाण्यात हद्दीत चोरी, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा आणि नगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी आणि बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
चौकट -
आळेफाटा पोलीस ठाण्याचे हद्दीत १४ डिसेंबर रोजी मंगरूळ परिसरातील खराडेमळा येथे रात्रीच्या वेळी सुनीता खराडे या ५५ वर्षीय जेष्ठ महिलेस लोखंडी पाईपचा धाक दाखवून अंगावरील सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे दागिने दरोडेखोरांनी लांबवले होते.
फोटो - : पुणे व अहमदनगर जिल्ह्यांत दरोडे टाकणाऱ्या अट्टल दोन दरोडेखोरांना अटक करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह पोलीस पथक.