बारामतीतील कसबा फलटण चौकात धुडगूस घालणारा ‘गँग’ म्होरक्या अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 08:06 PM2022-11-15T20:06:08+5:302022-11-15T20:06:16+5:30
बारामती शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी
बारामती : बारामती शहरातील एका हॉटेलचालकावर दहशत बसविण्यासाठी त्याच्या डोक्यात तलवारीने वार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. तसेच या हॉटेलची तोडफोड देखील करण्यात आली होती. पोलिसांनी आता या गँग म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ नोव्हेंबर रोजी भर दुपारी पोलीस ठाणे रेकॉर्ड वरील गुन्हेगार आदेश संजय कुचेकर व त्याचे साथीदार साहिल सिकिलगर, ऋषिकेश चंदनशिवे, तेजस बच्छाव, यश जाधव हे फलटण चौकातील हॉटेल दुर्वाज मध्ये गेले. तेथे जाऊन हॉटेल चालकासह व कामगारांवर दहशत बसवण्यासाठी तसेच त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी हॉटेलमध्ये तोडफोड केली. हॉटेल चालकाच्या डोक्यात धारदार तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी फिर्यादीच्या डोक्यात १३ टाके पडलेले होते. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ चंदनशिवे व बच्छाव यांना अटक केली होती. कुचेकर गुन्हा केल्यानंतर मुंबई येथे फरार झालेला होता. तो काल त्याच्या घरी आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.
या सर्व आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी, घराविषयी आगळीक व दंगल च्या कलमाप्रमाणे (३०७,३८४,४२७,१४३ ,१४७ ,१४९ सह आर्म अॅक्ट ं४२५ )नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदेश कुचेकर व त्याची गँग या भागात वारंवार गुन्हे करते. त्यांच्यामुळे सदर परिसरात भीतीचे वातावरण असल्याने त्यांच्यावर काही दिवसातच संघटित गुन्हेगारी थोपपवण्यासाठी करावी लागणारी कारवाई होणार आहे. त्याबाबत वरिष्ठांना अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक महाडीक यांनी सांगितले. आरोपीवर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक ,सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, पोलीस नाईक दशरथ कोळेकर ,पोलीस शिपाई तुषार चव्हाण ,पोलीस शिपाई जामदार व राणे यांनी कारवाई केली आहेत.
...भीतीपोटी अनेक जण तक्रार देत नाहीत
आदेश कुचेकरने काही महिन्यापूर्वी नितीन वाईन्स या दुकानावर सुद्धा तोडफोड करून हल्ला केला होता. तसेच एका कसब्यातील युवकालाही मारहाण केली होती. ज्या दिवशी हा गुन्हा केला, त्याच दिवशी त्यांनी चैत्राली बारमध्ये सुद्धा धुडगूस घातला होता. परंतु भीतीपोटी अनेक व्यावसायिक तक्रार देत नाहीत. तरी नागरीकांनी कुणाच्या तक्रारी असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी केले आहे.