लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 03:18 PM2021-01-04T15:18:07+5:302021-01-04T15:20:03+5:30

दृश्यम स्टाइल खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा खून केल्याचा गुन्हा उघड

The gang that robbed the petrol pump at Loni Kalbhor is arrested; Performance of the local criminal investigation department | लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी 

लोणी काळभोर येथे पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारी कोयता गॅंग गजाआड; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी 

googlenewsNext

लोणी काळभोर : पेट्रोलपंपावर धाडसी दरोडा टाकून लूटमार करणारी आणि खाजगी टूर्स ट्रॅव्हल कार चालकाचा दृश्यम स्टाइल खून करणारी कोयता गॅग जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने यश मिळवले आहे .

 याप्रकरणी किरण भाऊसाहेब थिटे ( वय २१, रा. केंदूर ता. शिरूर जि. पुणे ), गौरव बाळू ढवळे ( वय २१, रा. खोपवस्ती, अष्टापुर ता. हवेली ), संतोष गोरख ब्राम्हणे ( वय २०, रा. शनि शिंगणापूर, ता. नेवासा जि. अहमदनगर ) भाऊसाहेब गौतम कुडुक ( वय २२, रा. शेकटा, ता.गेवराई जि. बीड ) व दक्षिणेस उर्फ दर्शन अनिल दांगट ( वय २१, रा उंब्रज, दांगट पट, ता. जुन्नर ) यांना अटक करण्यात आली आहे. 

 लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील बोरकर मळा येथील पेट्रोल पंपावर धारदार कोयते आणि लाकडी दांडके घेऊन २८ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ५ अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांना मारून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरी दरोडा टाकला होता. या दरोड्यात २ हजार ५०० रुपये रोख व ३७ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल असा एकूण ३९ हजार ५०० रुपयांचा माल चोरून नेला होता. या गुन्ह्याचा  तपास स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तपास करत होते. सीसीटिव्ही फुटेजवरून आरोपींचा माग काढला ते रांजणगाव गणपती येथील असल्याचे समजले. त्यावरून रांजणगाव ५ संशयित पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.  

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, राजू मोमीन, जनार्दन शेळके, विजय कांचन, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, धिरज जाधव, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने ताब्यात घेतले. 
 
पोलिसांनी केलेल्या तपासात आरोपींनी लोणी काळभोर येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच २ जानेवारी रोजी रांजणगाव येथे योगेश मचिंद्र गर्जे ( वय २५, रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे ) याची स्विफ्ट डिझायर गाडी बोलावून घेतली. त्यानंतर त्यांनी गाडीत बसून वणी गड येथे फिरायला जाण्यासाठी सोनेसांगवी ते मलठण रस्त्याला गाडी नेली. लघवीचे नाटक करून गाडी थांबवून ती चोरण्याचा प्रयत्न केला. चालक योगेशने त्यास विरोध केला असता त्याच्या तोंडावर कोयत्याने तसेच दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर भवरापूर ( ता हवेली ) येथील मुळा - मुठा नदी वरील पुलावर आणून पुलावरून योगेशचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याचा हेतूने नदीच्या पाण्यात फेकून दिला असल्याची कबुली दिली आहे. पुढील तपासासाठी त्यांना लोणी काळभोर पोलिस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: The gang that robbed the petrol pump at Loni Kalbhor is arrested; Performance of the local criminal investigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.