वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद
By admin | Published: May 9, 2015 03:21 AM2015-05-09T03:21:20+5:302015-05-09T03:21:20+5:30
भादलवाडी परिसरातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चार विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तत्परता दाखवून चार
पळसदेव / भिगवण : भादलवाडी परिसरातून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या चार विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी भिगवण पोलिसांनी तत्परता दाखवून चार आरोपींना जेरबंद केले. विद्युत मोटारी चोरीची टोळीच याद्वारे उघड होण्याची शक्यता आहे. अटक आरोपींना ४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्तात्रय महादेव जाधव (वय २६), सुखदेव मारुती भंडलकर (वय २६), तानाजी रामदास भंडलकर (वय २२, सर्व रा. भादलवाडी) व गौकिरण विश्वनाथ तिवारी (वय २४, रा. मदनवाडी, मूळ उत्तर प्रदेश) यांना अटक केली. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात विद्युतपंप, विद्युत रोहित्र चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या होत्या. भिगवण पोलिसांनी खबऱ्यामार्फत या गुन्ह्यांमधील आरोपींचा माग काढला. त्यानुसार चौघांना अटक करण्यात आली. विद्युत पंप चोरी करणारी टोळीच कार्यरत असल्याचे तपासात आढळून आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भादलवाडी परिसरातून प्रल्हाद श्रीपती यादव, गंगाराम बबन खारतोडे, वसंत बाजीराव कन्हेरकर, नंदकुमार प्रताप गायकवाड या शेतकऱ्यांच्या मोटारी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्यामुळे त्यांनी भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. चौघांना अटक केली. त्यांच्याकडून काही विद्युतपंपासह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. सहायक
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेत पोलीस नाईक नाना वीर, विलास मोरे, श्रीरंग शिंदे, शर्मा पवार, बापू हडागळे, रमेश भोसले यांनी सहभाग घेऊन कामगिरी केली. (वार्ताहर)