वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:31 AM2018-08-12T00:31:42+5:302018-08-12T00:31:54+5:30
महामार्गावर वाहनचालकांना अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बारामती - महामार्गावर वाहनचालकांना अडवून दरोडे टाकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बारामती गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित चौघे फरारी झाले आहेत. टोळीतील आरोपींवर खून, दरोड्यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जुलै २०१८ रोजी पहाटे २ च्या सुमारास सुपे-चौफुला रस्त्यावर सुपे घाटात मोकळा ट्रक निघाला होता. या वेळी तीन दुचाकींवरून आलेल्या ६ अनोळखी इसमांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. ट्रकचालकाला चाकूचा धाक दाखवून मारहाण करुन खिशातील १० हजार २०० रुपये चोरून नेले.
त्याच दिवशी सकाळी ६ च्या सुमारास पुणे-सोलापूरपासून कळस रस्त्यावर टेम्पोचालक सकाळी काही कारणास्तव थांबला होता. तेव्हाही ३ दुचाकीवरून आलेल्या ६ अज्ञात चोरट्यांनी टेम्पोत झोपलेल्या क्लीनरला मारहाण करुन त्याच्याकडील मोबाईल, तसेच चालकाला मारहाण करून त्याच्याकडील १ मोबाईल तसेच रोख रकमेसह २० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला होता.
त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचाºयांना सूचना दिल्या. दरम्यान, २१ जुलै रोजी पोलिसांना
गुप्त बातमीदारामार्फत संबंधित
गुन्हा गजानन किसन जाधव
(रा. कळंब, ता. इंदापूर, जि,पुणे) याने त्याच्या साथीदारामार्फत केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून गजानन जाधव यास ताब्यात घेतले. त्याने दोन्ही गुन्हे ५ साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक काटे यांनी गुन्ह्यातील
दुसरा आरोपी चेतन पोपट सावंत
(वय २१,रा. अशोकनगर, कळंब,
ता. इंदापूर) यास अटक केली.
अप्पर पोलीस अधीक्षक डा.ॅ पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक यादव, संदीप जाधव, शिवाजी निकम, स्वप्नील अहिवळे, संजय जगदाळे, दशरथ कोळेकर, संदीप मोकाशी, शर्मा, पवार, सुरेंद्र वाघ, संदीप कारंडे, अभिजित एकशिंगे, सदाशिव बंडगर यांनी ही कारवाई केली.
वालचंदनगर पोलीस ठाणे, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
गजानन जाधव याच्यावर अकलूज पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा, कर्नाटक राज्यातील विजापूर पोलीस ठाणे येथे दरोड्याचा गुन्हा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
फरारी आरोपींच्या नावावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारामारी यासारखे गंभीर गुन्हे माळशिरस, अकलूज, इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.