राजगुरुनगर स्थानकात चोरांची टोळी, गर्दीचा घेताहेत गैरफायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:05 AM2018-08-26T01:05:56+5:302018-08-26T01:06:08+5:30
गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली.
राजगुरुनगर : गर्दीचा फायदा घेऊन ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळी व महिलेच्या पर्समधील ६० हजार रुपयांचे पाकीट लांबविल्याची घटना राजगुरुनगर एसटी स्थानकामध्ये शुक्रवारी (दि. २४) घडली. खेड पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हौसीराम दगडू कुटे (वय ६१, सध्या रा. घाटकोपर, मुंबई; मूळ रा. कोहिंडे बुद्रुक, ता. खेड, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. कुटे सकाळी साडेअकरा वाजता परळ ते जांबूत गाडीने राजगुरुनगर एसटी स्थानकावर उतरले. त्यांना कडूस येथे सोसायटीमध्ये शेतीबाबतच्या कामासाठी जायचे होते. पावणेबाराच्या सुमारास कडूस गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील
दीड तोळे वजनाची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी अज्ञात चोरट्याने लांबविली.
दुसऱ्या घटनेत रंजना माणिक रोकडे (रा. राजगुरुनगर, ता. खेड, जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोकडे यांना डिंभे याठिकाणी जायचे होते म्हणून त्या राजगुरुनगर बसस्थानकात थांबल्या होत्या. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे-भीमाशंकर गाडी आली. गाडीला गर्दी होती. त्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र वाहकाने गर्दी असल्याने गाडीत येऊ नका असे दारातील लोकांना सांगितले, म्हणून त्या पुन्हा खाली उतरल्या.त्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून आतमध्ये ठेवलेले पैशाचे पाकीट लांबविले. त्यामध्ये तब्बल ६० हजार रुपये होते. खेड पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला असून, पोलीस नाईक तानाजी हगवणे पुढील तपास करीत आहेत.