पुण्यात विमानाने येऊन आयफोन चोरणारी टोळी जेरबंद; तब्बल ३० लाखांचे ३९ मोबाइल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 09:36 PM2023-02-27T21:36:29+5:302023-02-27T21:36:43+5:30
हाय प्रोफाइल कॉन्सर्टमधून ऑनलाइन तिकिटे बुक करून प्रवेश मिळवला अन् आपला चोरीचा धंदा सुरू केला
पुणे : विमानाने येऊन पुण्यातील हाय प्रोफाइल कॉन्सर्टमधून मोबाइल चाेरणाऱ्या दिल्लीतील टोळीला विमानतळ पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून ३० लाख २७ हजार रुपयांचे ३९ महागडे मोबाइल जप्त केले आहेत. त्यात २१ आयफोनचा समावेश आहे.
असद गुलजार महंमद (वय ३२, रा. दिल्ली), निजाम बाबू कुरेशी (वय ३५, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश), शाहबाज भोले खान (वय २६, रा. दिल्ली), राहुल लीलीधर कंगाले (वय ३०, रा. गाझियाबाद, उत्तरप्रदेश) आणि नदीम इब्राहिम मलीक (वय ४० रा. दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २८ लाख ४० हजार रुपयांचे ३४ मोबाइल जप्त केले आहेत. तसेच याच कार्यक्रमामध्ये २४ फेब्रुवारी रोजी मोबाइल फोन चोरी करणाऱ्या प्रशांत के. कुमार (रा. शिमोगा, कर्नाटक) याच्याकडून १ लाख ८७ हजार रुपयांचे एकूण ५ मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
अधिक माहितीनुसार, नगररोडवरील महालक्ष्मी लॉन्स येथे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान व्हिएचवन सुपरसॉनिक कॉन्सर्ट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोबाइल चोरी होत असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. त्यानुषंगाने पोलिसांचे एक पथक कार्यक्रमस्थळी गस्त घालत होते. त्यावेळी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश शेवाळे यांना असद महंमद हा संशयितरीत्या फिरताना दिसला. त्याला पाठलाग करून पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने आम्ही कार्यक्रमामध्ये मोबाइल फोन चोरी करण्यासाठी दिल्ली येथून आलो असून, माझे साथीदार पुणे स्टेशन येथील मीलन हॉटेलमध्ये उतरल्याचे सांगितले. त्यानुसार त्याच्या चार साथीदारांना हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चोरीचे महागडे मोबाइल मिळाले.
ही कारवाई पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, संगीता माळी, उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, समू चौधरी, कर्मचारी सचिन जाधव, अविनाश शेवाळे, सचिन कदम, रुपेश पिसाळ, अंकुश जोगदंडे, नाना कर्चे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, शिवराज चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.
आयफोनचीच चोरी
चोरी करणाऱ्या टोळीतील सर्व आरोपी हे विविध ठिकाणी काम करतात. इम्रान याने सर्वांना एकत्र करून ही योजना आखली. त्यासाठी त्याने हायप्रोफाइल परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमाची निवड केली. अधिकृत ऑनलाइन तिकिटे बुक करून प्रवेश मिळवला अन् आपला चोरीचा धंदा सुरू केला. मात्र, एका व्यक्तिला ही माहिती मिळाली अन् पोलिसांनी त्यांना जेरबंद केले.