हिंजवडीत लूटमार करणारी महिलांची टोळी
By admin | Published: August 25, 2015 04:58 AM2015-08-25T04:58:34+5:302015-08-25T04:58:34+5:30
हिंजवडी आयटी परिसरात रात्री थांबून परुषांची लुबाडणूक करणाऱ्या तरुणींचे टोळके सक्रिय असून, या टोळक्याने अनेक आयटी अभियंत्यांची, तसेच या परिसरातील गृहप्रकल्पांत काम
वाकड : हिंजवडी आयटी परिसरात रात्री थांबून परुषांची लुबाडणूक करणाऱ्या तरुणींचे टोळके सक्रिय असून, या टोळक्याने अनेक आयटी अभियंत्यांची, तसेच या परिसरातील गृहप्रकल्पांत काम करणाऱ्या कामगारांची
लुबाडणूक केली आहे. काही आयटी अभियंत्यांनी अशा कटू अनुभवांची व्यथा भाजपाच्या एका पदाधिकाऱ्यापुढे मांडली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. लुबाडणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीमुळे हिंजवडीतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
टी शर्ट-जिन्स परिधान करून रात्री फेरफटका मारायचा. आयटी कंपन्या सुटण्याच्या वेळी ठिकाण निश्चित करून थांबायचे, अंगप्रदर्शन करून ये-जा करणाऱ्यांमध्ये सावज शोधायचे. कोणी पुरुष जवळ आला, की त्याच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करीत आरडाओरडाही करायचा. त्यांच्याच टोळक्यातील काही पुरुष लगेच त्या ठिकाणी हजर होणार. संबंधिताला धक्काबुक्की करून पोलिसांकडे तक्रार करण्याची भीती दाखवायची. त्याची घाबरगुंडी उडताच त्याच्याकडील रक्कम लुबाडायची, असा प्रकार हिंजवडी आणि वाकड परिसरात सुरू आहे. रविवारी रात्री असाच प्रकार घडला. एका सुरक्षारक्षकाला लुबाडले. त्याच्या खिशातील दोन हजारांची रोकड काढून घेतली. सुरक्षारक्षकाने ज्या ठिकाणी कामाला आहे, त्या मालकाला मोबाईलवरून याबाबत कळविले. मालक त्याच भागात राहण्यास असल्याने रात्री सुरक्षारक्षकाच्या मदतीला धावून गेले. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. हिंजवडी पोलीस ठाण्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर हिंंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्तीवरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. तरुणींना ताकीद देऊन सोडून दिले. सुरक्षारक्षकाच्या मदतीला धावून गेलेल्या मालकाचे मित्र भाजपाचे पदाधिकारी आहेत. त्यांच्यापर्यंत ही खबर पोहोचली. त्या वेळी अशा अनेक तक्रारी आपल्याकडे यापूर्वीच आल्या आहेत. पोलिसांना कळवूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या सात महिन्यांत या परिसरात लूटमार करणाऱ्या महिलांच्या टोळीकडून अनेक कामगार आणि आयटी अभियंत्यांची लुबाडणूक झाली आहे. प्रकरण पोलिसांत जाईल, बदनामी होईल, या भीतीने रात्री या टोळीच्या कचाट्यात सापडणारे अभियंते एटीएममधून पैसे काढून देतात. याची वाच्यताही करीत नाहीत. थेट पोलिसांकडे जाण्याऐवजी अन्य मार्गाने या प्रकाराला आळा बसावा, यासाठी भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याकडे सुमारे २० लोकांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. रात्री ११नंतर या परिसरात देखण्या तरुणी दिसल्यास त्यांच्यापासून दूर राहा; अन्यथा लुबाडणूक होईल, असे आवाहन त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)