कासुर्डीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; धक्क्याने वडिलांचा पोलीस ठाण्यातच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 06:46 AM2018-12-13T06:46:37+5:302018-12-13T06:46:49+5:30
उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
यवत : उसाच्या गुऱ्हाळावर काम करणाऱ्या मजूर तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिच्यासह कुटुंबाला डांबून ठेवण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दौंड तालुक्यातील खामगाव येथे आॅक्टोबरपासून हा प्रकार सुरू होता. तक्रार द्यायला आलेल्या पीडितेच्या वडिलांचा पोलीस ठाण्यातच बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने या कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे. पीडित तरुणी, कुटुंबीय आणि आरोपी परप्रांतीय आहेत.
यवत पोलिसांनी नदीम या परप्रांतीय ठेकेदारासह मोहसीन व दिलवाज या दोन कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील पीडित तरुणी व तिचे कुटुंबीय खामगाव येथील गुºहाळावर मजूर होते. ठेकेदार नदीम याने पीडितेला १० आॅक्टोबर रोजी कासुर्डीच्या हद्दीत शेतात बोलावून घेतले. तेथे त्याचा भाऊ मोहसीन व साथीदार दिलवाज फुरकान (पूर्ण नावे माहीत नाही. तिघे रा. उत्तराखंड) यांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या वडिलांनी जाब विचारला असता आरोपींनी संपूर्ण कुटुंबालाच काही दिवस डांबून ठेवले.
आरोपींनी १७ आॅक्टोबर रोजी साडेसात हजार रुपये देऊन दौंड येथून दिल्लीला जाणाºया रेल्वेमध्ये या कुटुंबाला बसवून दिले आणि कोणाला काही सांगितल्यास जिवे मारू अशी धमकी दिली. मात्र, पीडितेने कुटुंबीयांसोबत गंगाहर पोलीस ठाणे (ता. रुडकी, उत्तराखंड) येथे फिर्याद दिली. ती यवत पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यावरून मोहसीन व दिलवाज यांना अटक केलीे.
दरम्यान, पीडिता व तिचे वडील मंगळवारी यवत पोलीस ठाण्यात आले. तेथे वडिलांचा बुधवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.