टोळक्याचा धिंगाणा; सिमेंटचे खोके वापरून ९ कार फोडल्या, पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 01:29 PM2022-08-21T13:29:15+5:302022-08-21T13:29:57+5:30
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा अज्ञातांविरोधात तक्रार दाखल
धनकवडी : शहरासह उपनगरांमधील वाहनांच्या तोडफोडीच्या घटना काही कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. आता ही आंबेगांव पठार येथील स.न. १९, स्वामी नगर, महारुद्र जीम परिसरात शनिवारी रात्री धिंगाणा घालत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी रस्त्यावर पार्क केलेल्या नऊ गाड्यांची तोडफोड केली असून यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दहा ते पंधरा अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी गणेश दिलीप रांजणे (वय ३१ वर्षे, रा. स्वामीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मात्र, अद्यापही कोणालाही अटक केलेली नाही.
दक्षिण उपनगरात तोडफोडीचं सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण, गेल्या काही दिवसांपासून सहकारनगर, पद्मावती, पर्वती, जनता वसाहत अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाहनांची तोडफोड झाली आहे. यामुळे वाहन धारकांच मोठं नुकसान होत आहे. मात्र तोडफोडचं हे सत्र काही थांबताना दिसत नाही.
सिमेंट बाँक्सच्या साह्याने फोडल्या गाड्या..
शनिवारी रात्री दहाच्या सुमारास वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच ओमीनी गाडीचा देखील समावेश आहे. सिमेंट बाँक्स च्या साह्याने तोडफोड करण्यात आली त्यामुळे वाहनांच्या प्रचंड नुकसान झाले आहे.