Pune Police: गुंड निलेश घायवळला पोलिसांचा पुन्हा दणका; नेमकं काय झालं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2024 11:07 AM2024-04-09T11:07:50+5:302024-04-09T11:08:04+5:30
पुणे-नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा जात होता...
- किरण शिंदे
पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याला पुणे पोलिसांनी पुन्हा दणका दिला आहे. पुणे-नगर रस्त्यावरून निलेश घायवळ आणि त्याच्या साथीदाराचा ताफा जात असताना खराडी परिसरात वाहतूक पोलिसांनी त्याचा ताफा अडवला. सुरुवातीला त्याने पोलिसांशी हुजत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनीही त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि दंड वसूल केला. गाडीवर काळ्या काचा लावल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल सहा हजार रुपयाचा दंड बसून केला.
नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड म्हणून ओळखला जातो. घायवळच्या टोळीची कोथरुड परिसरात दहशत होती. त्याच्याविरूद्ध खून, खूनाचा प्रयत्न, मारामारी, दुखापत करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, असे एकूण १४ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. नीलेश घायवळ आणि गजानन मारणे याच्या टोळीच्या वर्चस्ववादातून शहर आणि जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या दोघांच्या दुश्मनीमध्ये पुण्यात कितीतरी गुंडांची हत्या झाली.
नीलेश घायवळ एकेकाळी गजानन मारणेचा जवळचा मित्र आणि विश्वासू साथीदार म्हणून ओळखला जायचा. मारणे टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात वाढली. मारणे आणि घायवळने अनेक तरुणांना टोळीत सामील करून घेतले होते. वर्चस्व, आर्थिक व्यवहारातून दोघांमध्ये सुप्त संघर्ष सुरू होता. अखेर दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली. नंतर मारणे टोळीत उभी फूट पडली आणि घायवळने स्वत:ची टोळी सुरू केली.