गँगस्टर शरद मोहोळ २ महिन्यांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:12 AM2021-03-08T04:12:01+5:302021-03-08T04:12:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पतित पावन संघटनेच्या शाखेच्या वतीन आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होऊन आपले शक्ती प्रदर्शन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पतित पावन संघटनेच्या शाखेच्या वतीन आयोजित सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी होऊन आपले शक्ती प्रदर्शन करणे गँगस्टर शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना चांगलेच भोवले आहे. पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी शरद मोहोळ व त्याच्या १६ साथीदारांना पुढील २ महिने शहरात प्रवेश करण्यास तसेच वास्तव करण्यास मनाई केली आहे. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
शहरात एखादा गुन्हेगार गुन्हे करण्याचे थांबवत नसेल तर त्याला साधारण १ ते २ वर्षांसाठी तडीपार केले जाते. मात्र, या प्रकरणात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे शरद मोहोळ व त्याच्या साथीदारांना पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात दोन महिने प्रवेश व वास्तव करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
पतित पावन संघटनेच्या शाखेचे ५० वा वर्धापन दिनानिमित्ताने गुरुवार पेठेतील कृष्णहट्टी चौकात सत्यनारायण महापूजेचे २६ जानेवारी रोजी आयोजन केले होते. गँगस्टर सचिन मोहोळ व त्यांचे साथीदारांनी बेकायदा गर्दी करून आरडाओरडा करीत कार्यक्रमाचे ठिकाणी आले. परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. तेथे आलेले लोक भीतीने घाबरून निघून गेले होते. गँगस्टर गुंड शरद मोहोळ हा नुकताच येरवडा करागृहातून गुन्ह्यातून निर्दोष सुटला असल्याने आपली व आपली गँगची पुणे शहरात पूर्वीप्रमाणे दहशत राहावी, या उद्देशाने या ठिकाणी त्यांनी दहशत निर्माण केली. तसेच कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून कोणतीही काळजी घेतली नव्हती. त्यामुळे खडक पोलिसांनी १६ फेब्रुवारी रोजी त्याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल केला होता.
शरद मोहोळ व त्याचे १६ साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. शरद मोहोळ यांच्या आक्रमक वागणुकीमुळे व वर्तनामुळे विघातक घटना होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याला व त्याच्या साथीदारांना शहर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.