गँगस्टर शरद मोहोळच्या पत्नीचा चंद्रकांत पाटलांचा उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 07:53 PM2023-04-20T19:53:16+5:302023-04-20T20:10:28+5:30
कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत...
पुणे : पुण्यातील गुंड शरद मोहोळ याच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वाती मोहोळ यांचा भाजपमध्ये प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक उपस्थित होते. शरद मोहोळ हा कुख्यात गुंड आहे. त्याच्या विरोधात पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.
पुणे पोलिसांनी शरद मोहोळविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईसुद्धा केली होती. शरद मोहोळ (pune gangster sharad mohol येरवडा कारागृहात असताना त्यांनी दहशतवादी कातील सिद्दिकी याचा खून केला होता. अशा कुख्यात गुंडाच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यापूर्वी टाळला होता प्रवेश-
दोन वर्षांपूर्वी झालेल्या भाजपच्या एका कार्यक्रमातही स्वाती मोहोळ यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या कॉफी टेबल बुकच पुण्यात प्रकाशन झाले होते. त्यावेळी गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा विशेष सत्कार केला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते त्यांनी शक्तिप्रदर्शन करण्यासाठी आणले होते. पण त्यावेळी स्वाती मोहोळ यांना पक्षात प्रवेश देण्यात आला नव्हता.
एरवी प्रत्येक कार्यक्रमानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी मात्र या पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोण आहे शरद मोहोळ?
गुंड शरद मोहोळ हा संशयित दहशतवादी कातिक सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहे. पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटाच्या वेळेस दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा संशयित दहशतवादी कातिल सिद्दीकीला अंडासेलमध्ये गळा आवळून फास दिल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र पुराव्याअभावी शरद मोहोळ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्याच्या विरोधात पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात अनेक गुन्हे दाखल आहेत.