पुण्यात दादागिरी; गुंड स्थानबद्ध, नागपूर जेलमध्ये वर्षभर मुक्काम
By विवेक भुसे | Published: January 2, 2024 08:46 PM2024-01-02T20:46:36+5:302024-01-02T20:46:49+5:30
आरोपीवर कोयता, रॉड, चाकू अशा हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे
पुणे : वाकडेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या गुंडावर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी एमपीडीए अन्वये कारवाई करून स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे.अजमेर जावेद शेख (वय २२, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे या गुंडाचे नाव आहे.
अजमेर शेख याने आपल्या साथीदारांसह पाटील इस्टेट परिसरात कोयता, रॉड, चाकू अशा हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी, दंगा, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखी गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षांमध्ये ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. खडकी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पीसीबीचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत बेदरे यांनी एमपीडीए कायद्यान्वये प्रस्ताव पोलिस आयुक्तांना सादर केला. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी प्रस्तावाची पडताळणी करून शेख याला एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी आतापर्यंत ७८ अट्टल गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.