पुण्यात मोहरमच्या मांडवातच गॅंगवॉर; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा गुंडावर कोयत्याने हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 14:57 IST2021-08-23T14:57:07+5:302021-08-23T14:57:26+5:30
खडकी बाजार येथील कसाई मोहल्लामधील मोहरमच्या मंडपात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता ही घटना घडली.

पुण्यात मोहरमच्या मांडवातच गॅंगवॉर; पूर्ववैमनस्यातून टोळक्याचा गुंडावर कोयत्याने हल्ला
पुणे : पूर्ववैमनस्यातून चांदणे गँगच्या टोळक्याने रेकॉर्डवरील गुंडावर काेयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खडकी बाजार येथील कसाई मोहल्लामधील मोहरमच्या मंडपात शनिवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.
साहिल ऊर्फ भिंगरी समीर खान (वय १९, रा. खडकी बाजार) याने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसानी शुभम आगलावे, सलमान शेख, नकुल गायकवाड, प्रजय काळे, तरुण यांच्यावर गुन्हा दाखल केला असून प्रतिक राहुल लोंढे (वय १८, रा. खडकी बाजार) याला अटक केली आहे.
साहिल खान हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. डिसेंबर २०२० मध्ये आरोपींनी फिर्यादीचे विरुद्ध पोलीस केस केली होती. खान हा शनिवारी मोहरमच्या मंडपात बसला असताना आरोपी मोटारसायकलवरुन ट्रीपलसीट आले. सलमान शेख याने साहिल खानला खुन्न्सने का पहातो, आम्ही चांदणे गँगचे भाई आहोत. खडकी भागात आमची दहशत आहे. असे म्हणून आरोपींनी त्याला घेरले.
सलमान शेख याने त्याच्याकडील कोयत्याने साहिलच्या डोक्यात व चेहऱ्यावर तसेच पायाचे मांडीवर, हातावर मारुन जबर जखमी केले. फिर्यादी जीव वाचविण्यासाठी पळून जात असताना त्याच्यावर दगड फेकून मारले व परिसरात दहशत पसरवून निघून गेले. खडकी पोलिसांनी बेकायदा जमाव जमवून दंगल माजवणे, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन प्रतिक लोंढे याला अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक साळवी अधिक तपास करीत आहेत.