Pune | खालुंब्रेत पाच लाखांचा गांजा जप्त; एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:55 PM2023-01-18T12:55:16+5:302023-01-18T12:56:17+5:30
एनडीपीएस ॲक्टनुसार म्हाळुंगे पोलिस चौकीत गुन्हा दाखल...
चाकण (पुणे) : म्हाळुंगे पोलिस चौकीच्या हद्दीतील खालुंब्रे येथे एकाकडून पाच लाख रुपये किमतीचा २५ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आले असून त्याच्यावर एनडीपीएस ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुन्ना नाहक (सध्या रा. चाकण, मूळ रा. ओडिशा) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस ॲक्टनुसार म्हाळुंगे पोलिस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा कार्यभार विनायक कुमार चौबे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी एमआयडीसी हद्दीमध्ये बेकायदेशीर/ अवैध दारू, जुगार, मटका, गांजा व अन्य अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाई करून सदर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसार म्हाळुंगे पोलिस चौकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तपास पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार (दि.१५) जानेवारी रोजी पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम खालुंब्रे परिसरात गांजा विक्री करण्याकरिता येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड व इतरांचे तपास पथक तयार केले. त्यावेळेस संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास एक संशयित इसम त्या परिसरात आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव मुन्ना नाहक असे सांगितले व त्याच्याजवळील बॅग व गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण १० बॉक्स आढळून आले. प्रत्येक बॉक्समध्ये २.५ किलो गांजा असा एकूण २५ किलो गांजा किंमत अंदाजे ५ लाख रुपये मिळून आला असून, तो जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त विनयकुमार चौबेंसह पोलिस आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलिस आयुक्त संजय शिंदे, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील, पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड व इतरांनी केली आहे.