बाप्पांच्या कृपेने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; यंदा ३ ठिकाणी साजरा होणार गणेशोत्सव, पुनीत बालन यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 12:45 PM2024-08-30T12:45:59+5:302024-08-30T12:46:46+5:30

भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर खोऱ्यात मात्र गेल्या ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला

ganpati bappa grace will bring peace in Kashmir This year Ganeshotsav will be celebrated in 3 places informed by Punit Balan | बाप्पांच्या कृपेने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; यंदा ३ ठिकाणी साजरा होणार गणेशोत्सव, पुनीत बालन यांची माहिती

बाप्पांच्या कृपेने काश्मीरमध्ये शांतता नांदेल; यंदा ३ ठिकाणी साजरा होणार गणेशोत्सव, पुनीत बालन यांची माहिती

पुणे : भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीर खोऱ्यात यंदाही सलग दुसऱ्या वर्षी सार्वजनिक गणशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी आता तीन ठिकाणी हा उत्सव साजरा होणार असून या मंडळांना येत्या शनिवारी (दि. ३१) पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मूर्ती सुपूर्द करण्यात येणार आहेत. पुणे शहरातील सात गणेश मंडळांमध्ये पुणे येथील कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग गणपती, केसरी वाडा हे मानाचे पाच गणपती तसेच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती आणि अखिल मंडई मंडळ या सात मंडळांचा समावेश आहे. 
  
‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’चे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी ही माहिती दिली. पुण्यातून मुहर्तवेढ रोवला गेलेला सार्वजनिक गणेशोत्सव साता समुद्रपार पोहचला आहे. जगभरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मात्र, भारताचा अविभाज्य भाग असलेला काश्मीर खोऱ्यात मात्र गेल्या ३४ वर्ष गणेशोत्सव साजरा केला जात नव्हता, ही बाब लक्षात घेऊन काश्मीरमध्ये पुन्हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला. पुण्यातील मानाच्या सात गणपती मंडळांनी एकत्र येत त्यासाठी पाऊल टाकले आणि गतवर्षी कश्मीरमधील लाल चौकात गणपतीयार मंदिरात दीड दिवसांचा गणपती उत्सव जल्लोषात साजरा झाला. आता यावर्षीही कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची मूर्ती बसविण्यात आली होती. आता यावर्षी अनुक्रमे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम व मानाचा चौथा गणपती तुळशीबाग यांच्या मूर्ती त्यासाठी सुपूर्त केल्या जाणार आहेत. येत्या शनिवारी काश्मीरमधील तिनही मंडळांच्या कार्यकर्त्यांना या मूर्ती प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पुनीत बालन यांनी दिली.

‘‘काश्मीरमध्ये ३४ वर्षानंतर गतवर्षीपासून आम्ही पुन्हा गणेशोत्सव सुरू केला. यावर्षी पुण्यातील सात गणेश मंडळांच्या सहकार्याने कुपवाडा व अनंतनाग या आणखी दोन ठिकाणी पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा होणार आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून आम्हाला होता आलं याचा मनस्वी आनंद आणि समाधान आहे. गणपती बाप्पाच्या कृपेने काश्मीर खोऱ्यात शांतता नांदेल आणि तेथे भरभराट होईल, अशी खात्री आहे.’’ - पुनीत बालन (उत्सवप्रमुख व विश्वस्त, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

Web Title: ganpati bappa grace will bring peace in Kashmir This year Ganeshotsav will be celebrated in 3 places informed by Punit Balan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.