‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’; गौरी-गणपतीला भक्तीभावाने निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 01:07 PM2024-09-13T13:07:48+5:302024-09-13T13:08:20+5:30
घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले, त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष करीत गौरींसह पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पाला गुरुवारी भक्तिभावाने निरोप देण्यात आला. विसर्जन घाटांवर ठिकठिकाणी आरतीचे सूर निनादत होते. घाटांवर गणेशमूर्तीची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. सुख-समृद्धी घेऊन सोनपावलांनी आलेल्या गौरी विसर्जनाबरोबरच गणपतीचे विसर्जन करण्यात आले.
गाैरी-गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर वाटली डाळ, खोबऱ्याची खिरापत वाटण्यात आली. माहेरवाशिण म्हणून घरोघरी आलेल्या गाैरींचे बुधवारी पारंपरिक पद्धतीने आवाहन करीत त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी हळदी-कुंकू करण्यात आले. गुरुवारी मात्र गौरींना निरोप देण्यात आला. काही घरांमध्ये गौरींबरोबरच गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. घराण्याच्या कुळाचारानुसार गौरींचे मुखवटे हलवून विसर्जन करण्यात आले. त्यानंतर गणपतीचे विसर्जन करण्यात आले. सनईचे मंगलमय सूर आणि ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन घाटांवर ठिकठिकाणी बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती विसर्जनाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. महापालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागांत बांधलेल्या हौदांमध्ये, तर नदी काठाजवळ राहणाऱ्या नागरिकांनी किनाऱ्यावर ठेवलेल्या हौदांमध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन केले. संध्याकाळी विसर्जन घाटांवर गर्दी झाली होती. पावसाने विश्रांती घेतल्याने विसर्जनाला आलेल्या भाविकांची गैरसोय झाली नाही.