जीएसटीतून बाप्पांची सुटका, पण उत्सवाची नाही; गणेश मंडळांना फटका बसणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:00 PM2022-07-22T12:00:08+5:302022-07-22T12:00:20+5:30
बाप्पावर जीएसटी नसला तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या मांडव, विद्युत रोषणाई तसेच पूजा साहित्यांवरही जीएसटी लागणार
पुणे : देशभर चर्चा असलेल्या जीएसटीची धास्ती बाप्पांच्या भाविकांनाही घ्यावी लागणार आहे. थेट बाप्पावर जीएसटी नसला तरी त्याच्यासाठी लागणाऱ्या मांडव, विद्युत रोषणाई तसेच पूजा साहित्यांवरही जीएसटी लागणार आहे. थोडक्यात बाप्पाची जीएसटीमधून सुटका झाली तरी बाप्पाचा उत्सवाला त्याचा फटका बसणार आहे.
खाण्याच्या पदार्थांवर जीएसटी लागू झाल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. बंद पाकिटात कोणतेही ब्रँडेड पदार्थ घेतले तर त्यावर आता जीएसटी द्यावा लागणार आहे. गणेशोत्सवालाही केंद्र सरकारच्या या कराचा मोठा फटका बसणार आहे. बाप्पाच्या मूर्तीवर जीएसटी लागणार नाही, पण दुकानदारांकडून बाप्पासाठी काही विकत घेतले किंवा त्याच्या मुक्कामासाठी म्हणून मंडप वगैरे घातला तर त्यावर मात्र मंडळांना जीएसटी द्यावा लागेल.
याचा फटका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बसणार आहे. उत्सवासाठी मंडप टाकला जातो. त्याची पावती घेतली जाते. मंडप व्यावसायिक ही पावती देताना मंडळाकडून जीएसटी घेणार. कारण पावतीचा व्यवहार आल्यामुळे त्याला ग्राहकांकडून कर द्यावा लागणार आहे. हा कर दुकानदार थेट सरकारजमा करेल. त्याचा त्याला काहीच फायदा होणार नाही. मात्र, मंडळाला पावती हवी असेल तर हा कर द्यावाच लागणार आहे. सार्वजनिक मंडळांना त्याचा हिशेबाचा ताळेबंद धर्मादाय आयुक्तांना सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे त्यांना पावती घ्यावीच लागणार आहे.
हाच प्रकार पूजा साहित्याबाबतही होणार आहे. मोठ्या मंडळांची पूजेसाठीची तयारीही मोठीच असते. त्यात नैवद्यापासून अनेक गोष्टींचा समावेश आहे. ही खरेदी त्यांना दुकानदारांकडूनच करावी लागेल. तशी ती केली की त्यावर जीएसटी लावला जाईल.
मोठ्या मंडळांचे आर्थिक गणित बरेच मोठे असते. त्यामुळे त्यांना जीएसटीही मोठाच द्यावा लागेल. लहान मंडळांना मात्र त्याचा त्रास होणार नाही. कारण त्यांचे बहुतेक व्यवहार पावतीविनाच असतात. - नरेंद्र टिकार, कर सल्लागार