'आमच्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर'; पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 10:29 AM2022-09-14T10:29:00+5:302022-09-14T10:30:37+5:30
दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत...
पुणे : यंदाच्या वर्षी विसर्जन मिरवणुकीला विलंब लागल्याची नैतिक जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. पुढील वर्षात पथकांची संख्या कमी करता येईल का? किंवा पथकातील वादकांच्या संख्येबाबत मर्यादा असावी का? याचा विचार केला जाईल. दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. पुढच्या वर्षीची मिरवणूक लवकरात लवकर संपविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन मानाच्या गणपती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिले.
यावेळी श्री कसबा गणपती मंडळाचे ऋग्वेद निरगुडकर, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाचे प्रसाद कुलकर्णी, श्री गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, श्री केसरी वाडा गणपती मंडळाचे अनिल सकपाळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्टचे उत्सवप्रमुख पुनीत बालन उपस्थित होते.
लक्ष्मी रस्त्याने मानाच्या गणपतींच्या आधी विसर्जन मिरवणूक काढण्याची परवानगी याचिका नुकतीच उच्च न्यायालयाने फेटाळली. या माध्यमातून भारतीय संस्कृतीची परंपरा जपली असून, हा जय पराजय नाही, तर सक्षम व्यवस्थेवर विश्वास आहे, हे सिद्ध झाले आहे. मानाच्या गणपतींची मिरवणूक २४ तास चालते, या आरोपात तथ्य नाही. मानाचे गणपती इतर मंडळांना तुच्छतेची वागणूक देतात, पोलिसांवर दबाव आणतात या गोष्टींना कुठलाही आधार नाही. ऐन गणेशोत्सवात न्यायालयात खेटे मारणे हे कार्यकर्ता म्हणून दुर्दैवी आहे. याचिकाकर्त्या मंडळाने आम्हाला किंवा पोलीस प्रशासनाशी चर्चा केली नाही. आमच्या हातात थेट नोटिसा पडल्या. पुढील वर्षी परंपरा अबाधित ठेवून परिवर्तनाची कास धरण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
भाविकांच्या भावना उत्स्फूर्त
यंदाच्या वर्षी मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक तब्बल १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत चालल्याने विसर्जन सोहळा संपण्यास विलंब लागला. त्याविषयी बोलताना नितीन पंडित म्हणाले, यंदा मिरवणुकीला उशीर होण्यास अनेक कारणे आहेत. दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर उत्सव साजरा होत असल्याने भाविकांच्या भावना उत्स्फूर्त होत्या व मिरवणूक मार्गावर भाविकांची गर्दी खूप असल्याने मिरवणुकीचा वेग मंदावला. मिरवणूक सुरळीत पार पाडणे ही पोलीस प्रशासनाची जबाबदारी असली तरी आम्ही त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पुढील रूपरेषा ठरवणार आहोत.