कोल्हापूर , सांगली जिल्हयातील पूरग्रस्तांच्या घरी पुण्यातील गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 05:51 PM2019-08-30T17:51:06+5:302019-08-30T17:55:17+5:30
पुराचा फटका बसल्यानंतर महिन्याभराच्या आतच गणेश उत्सव आला आहे...
पुणे : अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा प्रचंड मोठा तडाखा बसला. या तडाख्यामुळे तेथील रहिवाशांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावेल लागले. आजतागायत त्या परिसरातील जनजीवन आता कुठे पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभमीवर राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून मदतीचा हात पुढे आले. त्यात पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप आणि पुण्यातील विविध मंडळाकडून जीवनावश्यक वस्तू बरोबरच गणरायांच्या मूर्ती पूरग्रस्त कुटुंबाना भेट दिली आहे.
पुराचा फटका बसल्यानंतर महिन्याभराच्या आतच गणेश उत्सव आला आहे. मात्र या महापुरात सांगलीतील गणेशमूर्ती घडविणाऱ्या शेकडो बांधवांचे देखील नुकसान झाले. अनेक तयार झालेल्या गणपतीच्या मुर्ती भिजल्या आहेत. याशिवाय अनेकांचे संसार पाण्यात गेल्याने या घरामध्ये यंदा गणरायाची स्थापना करण्यासारखी परिस्थिती नाही. नेमकी हीच अडचण ओळखून पुण्यातील काही सामाजिक संस्थांनी सांगली,कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावात आणि घरात जीवनावश्यक वस्तू बरोबरच गणरायाच्या मूर्त्या देखील भेट दिल्या आहेत.
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या सहकार्यातून आणि जयहिंद स्पोर्टस असोसिएशन, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा, मुक्ताई सार्वजनिक ग्रंथालय, जागृती महिला मंडळ, राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिष्ठान, जयहिंद तरुण मंडळ या पुण्यातील संघटनांनी एकत्र येत सांगलीतील अनेक गावात गंणरायाच्या मुर्त्या या पूरग्रस्त सामान्य कुटुंबात दिल्या आहेत. यामुळे साध्या पद्धतीने का होईना या घरामध्ये गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे.