"घराबाहेर गणपती, सोसायटीचा 5 लाखाचा दंड...", पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत गणपतीवरून महाभारत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 01:36 PM2023-07-17T13:36:50+5:302023-07-17T13:49:16+5:30
कुटूंब विरुद्ध सोसायटी हा वाद आता न्यायालयात पोहोचला असून न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार
किरण शिंदे
पुणे : पुण्यात एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या नागरिकाने फ्लॅटच्या बाहेर गणपतीची मूर्ती ठेवण्याच्या कारणावरून त्या व्यक्तीला तब्बल सहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. ऐकून जरा विचित्र वाटते ना. पण हो असं खरंच घडलं. पुण्यातील वानवडी परिसरात असलेल्या फ्लावर व्हॅली या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडलाय.
संध्या होणावर आणि सतीश होणावर या ज्येष्ठ दांपत्याने वानवडीतील फ्लावर व्हॅली या उच्चभ्रू सोसायटी सातव्या मजल्यावर 2002 साली फ्लॅट विकत घेतला. त्यानंतर त्यांनी श्रद्धास्थान असलेली गणपतीची मूर्ती आपल्या फ्लॅटच्या बाहेर बसवली. नित्यनेमाने ते त्या गणेशाची पूजाअर्चा करतात. मात्र आता अचानक 20 वर्षानंतर घराबाहेर गणपतीची मूर्ती बसवल्यामुळे होणावर यांना सोसायटीने लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. एकीकडे कुटुंब माघार घेत नाही तर दुसरीकडे सोसायटी देखील माघार घेण्यास तयार नाही. सोसायटीतील सार्वजनिक जागेचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी कुणालाही करता येणार नाही. जिथे पूजा करता येईल तिथेच गणपती ठेवावा अशी विनंती आम्ही केली होती. मात्र ते ऐकायला तयार नाहीत.
पुणे शहरातील फ्लावर व्हॅली या उच्चभ्रू सोसायटीत एका गणपतीच्या मूर्तीवरून सुरू झालेला हा वाद आता टोकाला जाऊन पोहोचला आहे. होणावर फॅमिली विरुद्ध संपूर्ण सोसायटी असं स्वरूप सध्यातरी या वादाला आला आहे. चर्चेतून कोणताही तोडगा निघत नाही असं लक्षात आल्यानंतर आता हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.