जेजुरी कडेपठार गडावरील गणपूजा उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:08 AM2021-07-09T04:08:51+5:302021-07-09T04:08:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा गणपूजा उत्सव दरवर्षी कडेपठार मंदिरात साजरा होत असतो. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाचा गणपूजा उत्सव दरवर्षी कडेपठार मंदिरात साजरा होत असतो. हा उत्सव शनिवारी (दि. १०) होणार आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव रद्द करण्यात आला आहे. जेजुरीत जमावबंदीचा आदेश असून कोणीही भाविकांनी अगर नागरिकांनी कडेपठार मंदिरात येऊ नये, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.
जेजुरी गडावर दरवर्षी खंडोबा देवाचा धार्मिक गणपूजा उत्सव साजरा करण्यात येतो. या उत्सवाला कडेपठार गडावर ४० ते ५० हजार भाविकांची गर्दी होते. या वेळी रात्री बारा वाजेपर्यंत देवाला भंडारा अर्पण केला जातो. त्यानंतर छबिना निघून देवाचा जागर केला जातो. पहाटे भांडाराचा प्रसाद वाटून उत्सवाची सांगता होते. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होत असते.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देशानुसार राज्यातील सर्व देवसंस्थान व मंदिरे बंद असून, या आदेशानुसार जेजुरीचे कडेपठार मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे. तसेच जेजुरी गडावरील गणपूजा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. कोणीही भाविकांनी अगर नागरिकांनी कडेपठार रस्ता, तसेच मंदिरात येऊ नये. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, तसेच या ठिकाणी येण्यासाठी वापरण्यात आलेली वाहनेही जप्त केली जातील. कारवाई टाळण्यासाठी कोणीही कडेपठार मंदिरात येऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.