प्रवेश परीक्षांसाठी ‘गॅप’ घेण्याचा ट्रेंड
By admin | Published: July 8, 2017 03:04 AM2017-07-08T03:04:50+5:302017-07-08T03:04:50+5:30
विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी देशपातळीवर प्रवेश परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये एक वर्षाचा ‘गॅप’ घेण्याचा ट्रेंड वाढत आहे; तसेच या परीक्षांमध्ये टॉपर्स ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांचेच प्रमाण जास्त दिसून येत आहे.
देशपातळीवर वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये प्रवेशासाठी ‘नीट’, तर अभियांत्रिकी तसेच आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी ‘जेईई’ या प्रवेश परीक्षा घेतल्या जातात. या परीक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची$ संख्या लाखोंच्या घरात असते. त्यातुलनेत उपलब्ध प्रवेशक्षमता कमी आहे. प्रामुख्याने वैद्यकीय आणि आयआयटी या संस्थांमध्ये प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढली आहे. या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील एमबीबीएस व बीडीएस या अभ्यासक्रमांसह इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. मागील वर्षी केवळ एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.
महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळामार्फत इयत्ता बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे, तर ‘नीट’ ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेतली जाते. त्यामुळे ही परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांना कठीण जात असल्याबाबत सातत्याने चर्चा होत असते.
यामुळे ‘नीट’च्या तयारीसाठी खासगी कोचिंग क्लास लावणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे; तसेच अपेक्षित गुण नसणे, अपेक्षित अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळणे, विविध कारणांमुळे परीक्षेची तयारी न होणे, अशा विविध कारणांमुळे विद्यार्थी बारावीनंतर एक वर्ष कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेत नाहीत.
हे प्रमाण आता वाढत चालले असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. केवळ या परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थी व पालक ‘गॅप’ घेताना दिसत आहेत. वर्षभर खासगी कोचिंग क्लासमध्ये मार्गदर्शन घेऊन परीक्षेची तयारी करणे, हा त्यामागचा उद्देश असतो.
‘गॅप’ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढत आहे. विद्यार्थी वर्षभर योग्य पद्धतीने अभ्यास करीत नाहीत. त्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळतात. परिणामी, एक वर्षाचा गॅप घेऊन अभ्यासाची तयारी करतात. वैयक्तिक अडचणींमुळे कमी गुण मिळालेले विद्यार्थीही पुन्हा तयारी करताना दिसत आहेत; तसेच सध्या प्रवेश परीक्षा व प्रवेशासाठी वाढलेल्या स्पर्धेमुळे प्रवेश मिळण्याबाबत अनिश्चितता असल्याने काही विद्यार्थी गॅप न घेता मिळेल त्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत.
- दिलीप शहा
प्रवेश परीक्षा मार्गदर्शक
वैद्यकिय, आयआयटीपरीक्षांमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी गॅप घेतलेले असतात,
वैद्यकीय आणि आयआयटीमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ‘गॅप’ घेण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. ठराविक अभ्यासक्रम आणि संस्थांमध्ये प्रवेश घ्यायची, ही महत्त्वाकांक्षा असते; तसेच केवळ जीवशास्त्र किंवा गणित यांपैकी एकच विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असते. या परीक्षांमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी गॅप घेतलेले असतात, तर एकूण गॅप घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ २० टक्के विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळते.
- हरीश बुटले,
प्रवेशपूर्व परीक्षांचे अभ्यासक