Puneri Kisse: गप्पाजीरावांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; जाणून घ्या पुणेरी किस्से

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:41 PM2022-08-09T15:41:55+5:302022-08-09T15:43:05+5:30

स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख ते आता विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा पट असा बराच मोठा आहे. गप्पाजीरावांची त्यांची भेट होते त्यावेळी अन्य विषयांबरोबरच असे किस्सेही चर्चेला येतात. त्यातलेच हे दोन.

Gappajirao took Dr. Neelam Gorhe visit Know Puneri stories | Puneri Kisse: गप्पाजीरावांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; जाणून घ्या पुणेरी किस्से

Puneri Kisse: गप्पाजीरावांनी घेतली डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट; जाणून घ्या पुणेरी किस्से

googlenewsNext

तो म्हणाला, यांनी रस्त्यात विनयभंग केला

- महिलांच्या संदर्भातील एक काम आटोपून मी व आणखी दोन कार्यकर्त्या अशा तिघी रिक्षाने परत घरी यायला निघालो होतो. एकदम एक रिक्षा आमच्या बरोबरीनंच रस्त्यावर आली. ती चालवणाऱ्याने आमच्याकडे पाहत पाहत शेरेबाजी करायला सुरुवात केली. सुरुवातीला मला काही समजलं नाही; पण शेजारी बसलेल्या दोघींनी माझं लक्ष तिकडे वेधलं. मी पाहिलं तर गाणी म्हणत-म्हणत त्याचे छेड काढणं व्यवस्थित सुरू होतं. मी त्याच्यावर मोठ्यानं ओरडले तर आणखी काहीतरी बोलत तो एकदम जोरात पुढे गेला. मी आमच्या रिक्षाचालकाला त्याच्या पुढे जाऊन रिक्षा थांबवायला सांगितलं. मग तोही थांबला. खाली उतरला. वाद घालू लागला, तर आमच्या कार्यकर्तीने त्याला एक जोरात चापटी लगावली. त्याबरोबर तो रिक्षात बसला व रिक्षा सुरू करून निघाला. आम्हीपण त्याच्या मागे निघालो. मला वाटलं तो पळून जाईल; पण पाहते तर त्यानं रिक्षा थेट पोलीस चौकीत आणली. आम्हीही त्याच्या मागोमाग गेलो. आम्ही पोलिसांना काही सांगण्याआधीच तो पोलिसांकडे, ‘आम्ही त्याला भर रस्त्यावर मारल्याची’ तक्रार पोलिसांकडे करत होता. सुदैवानं पोलीस ओळखीचे निघाले. मला पाहताच त्यांनी त्या रिक्षाचालकाची चंपी करण्यास सुरुवात केली. तरीही त्याचा कांगावा सुरूच होता. महिलांची विनयभंगाची तक्रार घेता तर मग माझीही घ्या, यांनी भर रस्त्यात माझा विनयभंग केला असे त्याचं म्हणणं होतं.

अहो, झोपमोड होते

- सामाजिक कामात असल्याने अनेकजण काही ना काही तक्रारी करत असतात. एकदा असेच एक ज्येष्ठ नागरिक शेजारचे फार त्रास देतात, अशी तक्रार करत होते. अशा वैयक्तिक तक्रारींकडे सहसा फार लक्ष दिले जात नाही; पण हे ज्येष्ठ नागरिक होते व सतत पाठपुरावा करत होते. त्यामुळे मी एका कार्यकर्त्याला त्यांच्या सोसायटीत पाठवलं व काय प्रकरण आहे ते पाहण्यास सांगितलं. एक जुनी सोसायटी होती. परिसर सगळा शांत. तक्रार करणारे गृहस्थ दुपारी वामकुक्षी घेत. त्यांच्या दारासमोरच त्यांच्या शेजाऱ्यांची मोटारसायकल लागत असे. त्यांना सतत ये-जा करावी लागायची. या गृहस्थांचे म्हणणे होते की, मोटारसायकलीच्या सततच्या आवाजाने माझी झोपमोड होते, याचा काहीतरी बंदोबस्त करा. कार्यकर्ता डोक्याला हात लावून परत आला व हसत-हसत मला सांगू लागला. अशा तक्रारींचं करायचे काय?

-- गप्पाजीराव

Web Title: Gappajirao took Dr. Neelam Gorhe visit Know Puneri stories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.