लाखोंची घंटागाडी ठरतेय शोभेची वस्तू
By Admin | Published: May 31, 2017 01:34 AM2017-05-31T01:34:22+5:302017-05-31T01:34:22+5:30
परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा
लोकमत न्यूज नेटवर्क
आंबेठाण : परिसरात आलेल्या कारखानदारीमुळे अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या वराळेत कचऱ्याची समस्या बिकट होत आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी मंजूर होऊन आलेली घंटागाडी सुरू होण्याआधीच अखेरच्या घटका मोजू लागली आहे. या गाडीचा वापर होत नसल्याने ती गंजू लागली आहे. कचरा उचलला जात नसल्यामुळे गावात कचऱ्याचे ढीग साचले आहे. याचा त्रास ग्रामस्थांना होत आहे.
काँर्निंग इंडिया, सिंड्रेल, महिंद्रा यासह अनेक लहान मोठ्या कंपन्या वराळे गावाच्या परिसरात आल्या आहेत; त्यामुळे गावचे नागरिकीकरण वाढले आहे. परंतु या वाढत्या नागरिकीकरणाला सेवा देण्यास ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. कचऱ्याच्या समस्येने तर गावाला वेढले आहे. उद्योगांमुळे गावात बाहेरील नागरिक कामानिमित्त आले आहेत. यामुळे पायाभूत सुविधांवरील भार वाढला आहे.
गावाची कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य सुरेखा ठाकर यांनी त्यांच्या निधीतून एक घंटागाडी मंजूर केली होती. परंतु ही गाडी गावात आल्यापासून एकाच जागी उभी आहे. नवी कोरी गाडी येथील प्राथमिक शाळेच्या आवारात एका कोपऱ्यात उभी आहे. तीचा वापरच होत नसल्याने तिला गंज चढतो आहे. यामूळे ही गाडी खराब होण्याच्या मार्गावर आहे. गाडीवर फक्त जाहिरातबाजी होत आहे. गाडीला नंबर फ्लेटही नाही. त्यामुळे ही घंटागाडी गावासाठी केवळ शोभेची वस्तू ठरत आहे.
कचरा पेटवल्याने धुराचे लोट : आरोग्य धोक्यात
साठलेला कचरा कचरा पेटवून दिला जातो. त्यामुळे धुराचे लोट तयार होत असून त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. अनेक वेळा त्यात ओला कचरा असल्याने त्याची दुर्गंधी सुटत असून याचा त्रास नागरिकांना होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने यासाठी सिमेंटच्या कचरा कुंड्या आणल्या आहेत. परंत कचरा त्यात टाकण्याऐवजी आजुबाजुलाच टाकत आहेत.
वाढत्या कचऱ्याच्या खाद्य पदार्थावर जगणाऱ्या घुशी आणि भटक्या कुत्र्यांचे मात्र चांगले फावले आहे. या मोठमोठ्या घुशींचा त्रास मात्र गावातील नागरिकांना भोगावा लागत आहे. तसेच काही ठिकाणी भटक्या कुत्र्यांपासून वाटसरूंना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. गावातील कचऱ्याचे वाढते साम्राज्य आणि त्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास याचा विचार करून अडगळीत पडलेली आणि कचरा जमा करणारी घंटागाडी गाडी बाहेर काढून तिचा वापर करावा आणि नागरिकांना सेवा द्यावी.