पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 06:02 PM2019-06-19T18:02:15+5:302019-06-19T18:10:28+5:30

शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने ‘राडारोडा संकलन केंद्र’ उभारण्यात येणार आहे.            

'garbage' compilation center to be prepared by Pune Municipal Corporation | पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र

पुणे महापालिका तयार करणार ‘राडारोडा’ संकलन केंद्र

Next
ठळक मुद्देवाहतुकीसाठी प्रती मे.टन व प्रती किलोमीटरसाठी १९ रुपये दर निश्चित राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राडारोडा उचलण्यासाठी १८००२३३९५९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन

पुणे : शहरामध्ये दररोज निर्माण होणा-या प्रचंड राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. यामध्ये शहराच्या विविध भागात महापालिकेच्या वतीने ‘राडारोडा संकलन केंद्र’ उभारण्यात येणार आहे.            
शहरामध्ये सुरु असलेली खाजगी बांधकामे, रस्त्यांची कामे, मेट्रो प्रकल्पाचे कामे, विविध प्रकल्पांची कामे, अनधिकृत बांधकामांवरील कारवाई यामुळे दररोज शेकडो ट्रक राडारोडा निर्माण होतो. सध्या हा राडारोडा टाकणे व त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही स्वतंत्र यंत्रणा महापालिकेकडे नाही. यामुळे खासगी लोकासह अनेक सार्वजनिक बांधकामांचा राडारोडा देखील शहरातील विविध रस्त्यांच्या कडेला, नदी पात्र, ओढे-नाल्यांमध्ये टाकला जातो. तर काही ठिकाणी जाणीवपूर्वक नदी पात्र व अन्य सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करण्यासाठी या राडारोड्याचा वापर केला जातो. या सर्व प्रकरांवर निर्बंध घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने आता शहरामध्ये निर्माण होणा-या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी उपया-योजना करण्याचा निर्णय घेतला आहे. 
    याबाबत महापालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले की,  घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरामध्ये निर्माण होणा-या राड्यारोड्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे.  यात राडारोडा वाहतुक करणे, राडारोड्यावर प्रक्रिया करणे, राडारोडा ठेवण्यासाठी जागा निश्चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्यकतेनुसार भूभरावासाठी आणि उपनगरांमध्ये असलेल्या खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. यामध्ये महापालिका हद्दीतून राडारोडा संकलीत करून त्याच्या वाहतुकीसाठी प्रती मे.टन व प्रती किलोमीटरसाठी १९ रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये जीपीएस यंत्रणेद्वारे अंतराचे राड्यारोड्याचे मोजमाप करण्यात येईल. 
---------------
राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी येथे संपर्क करा
महापालिकेच्या वतीने शहरामध्ये खाजगी व्यक्ती, संस्थांकडून निर्माण होणा-या राडारोड्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. त्यामुळे नागरिकांनी राडारोडा उचलण्यासाठी १८००२३३९५९५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. निर्माण होणारा राडारोडा नदीपात्र, नाले, रस्ते यांच्या कडेला टाकला जाणार नाही, याची दक्षता आता महापालिकेकडून घेण्यात येणार असल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.

Web Title: 'garbage' compilation center to be prepared by Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.