शिवणेत कचरा डेपोला भीषण आग (सुधारित)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:10 AM2021-04-21T04:10:48+5:302021-04-21T04:10:48+5:30
नांदेड गाव : शिवणे, नांदेड पुलाजवळील कचरा डेपोला आग लागून त्यामध्ये तिघेजण होरपळल्याची घटना नांदेड गाव येथे घडली. ...
नांदेड गाव : शिवणे, नांदेड पुलाजवळील कचरा डेपोला आग लागून त्यामध्ये तिघेजण होरपळल्याची घटना नांदेड गाव येथे घडली. या दुर्घटनेत ग्रामपंचायतीची कचरा उचलण्याची घंटागाडीही जळून खाक झाली आहे. आगीत होरपळलेल्या तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी ३ अग्निशमन गाड्यांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. नांदेड सिटी अग्निशमन केंद्राचे प्रमुख सुजित पाटील, ४ फायरमन आणि २ चालक यांनी आग आटोक्यात आणली. जखमींमध्ये कचरा गोळा करणारे वृद्ध दाम्पत्य व एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा समावेश आहे.मंगळवारी सकाळी नांदेड शिवणे पुलाजवळ असलेल्या कचरा डेपोला आग लागली.
नांदेड गावचा संपूर्ण सुका कचरा पुलाजवळ आणून टाकला जातो. पुलाजवळ कचऱ्याचे ढीग दिसून येतात. कचऱ्याला आग लागल्यानंतर आगीचा भडका उडाला. जवळच उभ्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीने पेट घेतला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
लॉकडाऊनमुळे रस्त्यावर रहदारी कमी होती त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पूल आणि रस्ता लहान असल्यामुळे आग विझवण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्यांनाही कसरत करावी लागली.
फोटो- नांदेड फायर