आळंदी शहरातील ‘कचराकोंडी’ फुटणार
By admin | Published: April 8, 2015 03:41 AM2015-04-08T03:41:26+5:302015-04-08T03:41:26+5:30
तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे.
पुणे : तीर्थक्षेत्र आळंदीतील ‘कचराकोंडी’ आता सुटणार आहे. नगर परिषदेने कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसवली आहे. त्यामुळे नियमित कचरा उचला जाऊन त्याची तत्काळ विल्हेवाट लावता येणार आहे.
आळंदीत दरदिवशी साधारण १५ ते २0 टन, तर यात्राकाळात ४0 टन कचरा निर्माण होतो. नगर परिषद ठेकेदारामार्फत हा कचरा उचलते. मात्र, तो नियमित उचलला जात नाही, गाड्याच येत नाहीत, अशा अनेक तक्रारी येत असतात. यामुळे नगर परिषदेने ठेकेदावर नियंत्रण ठेवण्यासाठी व आळंदीत कुठेही कचरा राहू नये म्हणून ही जीपीएस यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, कचरा संकलनाच्या कामामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी नगर परिषदेच्या १0 कचरा वाहतुकीच्या वाहनांवर ही यंत्रणा बसविणे सक्तीचे केले आहे. नगर परिषदेच्या आज (मंगळवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत यास मान्यता मिळाली आहे.
यामुळे कोणत्या परिसरात कचरा उचलला गेला नाही, गाडी तेथे गेली नाही, अशी तक्रार आल्यास या यंत्रणेमार्फत त्याची फेरतपासणी करता येणार आहे. तसे आढळल्यास त्या ठेकेदारावर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)