दौंड शहराला कचऱ्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:08 AM2021-06-05T04:08:25+5:302021-06-05T04:08:25+5:30

दौंड : दौंड नगर परिषदेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असल्याने ...

Garbage dumped in Daund city, endangering the health of citizens | दौंड शहराला कचऱ्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दौंड शहराला कचऱ्याचा विळखा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Next

दौंड : दौंड नगर परिषदेची आरोग्य व्यवस्था कोलमडल्याने शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहिल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिक त्रस्त झालेले आहे. कोरोना या महामारीचे गांभीर्य लक्षात घेता शहरात नगर परिषदेच्या आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहे. शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या भरून कचरा रस्त्यावर अस्तव्यस्त पसरलेला आहे. त्यातच कुत्री, मांजरे, जनावरे यांचा संचार कचराकुंड्यावर असतो. परिणामी जनावरे कचरा अस्तव्यस्त करून कचरा रस्त्यावर येतो, याचा उपद्रव नागरिकांना होत आहे.

नगर परिषदेला कचरा टाकण्यासाठी जागा नाही, त्यामुळे सोईनुसार कुठेही गावाच्या बाहेर, जागा पाहून कचरा टाकला जातो. सध्या ज्या ठिकाणी कचरा टाकला जातो, त्या ठिकाणी पावसामुळे चिखलाचे साम्राज्य झालेले आहे. त्यामुळे कचरा वाहून नेणाऱ्या गाड्या कचरा डेपोपर्यंत जात नसल्याने शहरात कचराकुंड्यांत आणि रस्त्यांवर कचरा साचलेला आहे. सध्याच्या परिस्थितीत शहराला चोही बाजूने कचऱ्याने विळखा दिलेला आहे.

पावसाळा आणि कचरा

दौंड शहरात पावसाळ्यात कचरा आणि पाऊस असे समीकरण झालेले आहे. कचरा टाकण्यासाठी पावसाळ्यात वाहनांना कचरा डेपोपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसतो. त्यामुळे पावसाळ्यात शहरात कचरा साचलेला असतो. त्यातच पावसाळ्यात साथीचे रोग असतात. या रोगांना शहरातील कचऱ्याची बळकटी मिळते आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते.

कचरा डेपोला जागा नाही

दौंड नगर परिषदेला कचरा डेपोसाठी गावाबाहेर स्वमालकीची जागा नाही. आज याच्या जागेवर तर उद्या दुसऱ्याच्या जागेवर भाडेतत्त्वावर जागा घेऊन कचरा टाकला जातो. मात्र कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न अद्याप गेल्या अनेक वर्षांपासून सुटलेला नाही.

गटातटाच्या राजकारणाचा फटका

दौंड नगर परिषदेत नगराध्यक्ष गटाची नागरिक हित संरक्षण मंडाळाची सत्ता आहे तर नगरसेवक गटात राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीची सत्ता आहे. विविध विषय समित्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे आहे. सध्या राज्यात महाआघाडीचे सरकार असून जिल्ह्याचे पालकमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे तसेच आमदार राहुल कुल यांचे राजकीय पाठबळ घेऊन शहरातील कचरा डेपोच्या जागेचा प्रश्न कायम निकाली काढता येऊ शकतो. मात्र तसे काही होताना दिसत नाही. परिणामी गटातटाच्या राजकारणाचा फटका जनतेला बसत असल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागेल

दौंड शहरातील कचरा डेपोच्या जागेसाठी जागेचा शोध आणि त्याच बरोबरीने पाठपुरावा सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत पावसामुळे कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांना कचरा डेपो परिसरात रस्ता नसल्याने शहरात कचरा साचून आहे. मात्र यावर लवकरच मार्ग काढून कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला जाईल.

निर्मला राशिनकर

( मुख्याधिकारी )

दौंड शहरात साचलेला कचरा ( छायाचित्र --- मनोहर बोडखे )

Web Title: Garbage dumped in Daund city, endangering the health of citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.