सोसायट्यांतच जिरवला जातो कचरा
By admin | Published: May 13, 2017 04:52 AM2017-05-13T04:52:55+5:302017-05-13T04:52:55+5:30
मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी
लोकमत न्यूज नेटवर्क
धनकवडी : मागील २२ दिवसांपासून सुरु असलेली कचराकोंडी अखेर संपली. ज्या भागात कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्या ठिकाणी फारशी समस्या जाणवली नाही. काही सोसायट्या, घरे तसेच महापालिकेकडून चालविले जाणारे प्रकल्प यातून कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे.
धनकवडी प्रभाग ३९ चा बहुतेक भाग कंटेनरमुक्त आहे. यामध्ये ३ मोठ्या सोसायट्या आहेत. राघवनगर सोसायटीमध्ये १५० सदनिका आहेत व मागील दहा वर्षांपासून या ठिकाणच्या खत प्रकल्पामध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करुन खतनिर्मिती केली जाते. हे खत सोसायटीच्या बागेला वापरत असल्याने या ठिकाणची बागदेखील सदाहरीत व फुललेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच नर्सेस टाउन सोसायटीमध्येदेखील मागील दहा वर्षांपासून ३० बंगल्यांतून निघणारा २५ ते ३० किलो कचरा याच ठिकाणी जिरवला जात असून, निर्माण झालेले खत सभासदांना माफक दरात विकत असल्याचे व कमी मनुष्यबळ व जागेमध्ये कचरा जिरवला जात असल्याचे सोसायटीचे चेअरमन सुरेंद्र गाडगीळ यांनी सांगीतले.
गुलाबनगर सोसायटीमध्येदेखील असाच खत प्रकल्प असून, यामधून सोसायटीमधील सर्व कचरा जिरवला जातो. नागरिक आपला कचरा आपल्याच घरात जिरवत आहेत, या प्रभागात २५ कचरा वेचक वर्गीकरण केलेला कचरा जमा करतात. यातून एका अठवड्याला ५-७ टन वर्गीकृत केलेला १४ प्रकारचा वेगवेगळा सुका कचरा विकून आपली उपजीविका करत असल्याचे आरोग्य निरीक्षक प्रदीप राऊत यांनी सांगितले.
प्रभाग क्रमांक ४० दत्तनगरमध्ये १८० सदनिका असलेली आॅलिव्ह सोसायटीतदेखील दररोज निघणारा ८० ते १०० किलो कचरा या सोसायटीच्या आवारात खत प्रकल्पात जिरवला जातो. हेच खत सोसायटीमध्ये असणाऱ्या बागेत वापरले जाते, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन रवी अकोलकर यांनी दिली.