कचरा, घाण करणाऱ्यांकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 04:26 AM2020-11-26T04:26:03+5:302020-11-26T04:26:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास तसेच घाण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश पालिकेच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कचऱ्याचे वर्गीकरण न केल्यास तसेच घाण करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनीच धाब्यावर बसविले आहेत. ही कारवाई करण्यात स्थानिक क्षेत्रीय कार्यालयांकडून हात आखडता घेतला जात असून पालिकेच कर्मचारी तंबाखू-गुटखा खाऊन थुंकत असल्याचे चित्र आहे. कचरा जाळणाऱ्यांकडूनही दंड वसुली करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महिन्याभरापुर्वी याबाबतचे आदेश काढले होते. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार नागरिकांनी ओला, सुका आणि जैविक कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारक आहे. वर्गीकरण न करता कचरा दिल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला होता. नियमांचे पालन केल्यास पहिल्यांदा ६० रुपये, दुसºयांदा १२० रुपये तर पुढील प्रत्येक वेळी १८० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तर, रस्त्यावर कचरा करणे, सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणे, उघड्यावर लघवी करणे, उघड्यावर शौच करणे, पाळीव प्राण्यांना लघू शंका -शौचास नेणे, नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे आणि कचरा जाळणे असे प्रकार केल्यास दंड वसुली केली जाणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले होते.
परंतू, आयुक्तांच्या आदेशानंतरही याबाबतच्या कारवाईकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. क्षेत्रीय कार्यालयाकडील मनुष्यबळाला याबाबतची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु, ही कारवाई होताना दिसत नाही. शहराच्या काही भागात अगदी किरकोळ स्वरुपाच्या कारवाया केल्या जात आहेत.
====
पालिका आणि पोलिसांकडून मास्क न वापरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. आजवर साडेआठ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. जागोजाग पोलीस तपासणी करीत असतानाही रस्त्यावर थुंकणा-यांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. गुटखा, पानमसाला आदी खाऊन रस्त्यावर पिंक टाकणा-यांची संख्या वाढत आहे.
====
प्रकार दंड
रस्त्यावर कचरा करणे १८०
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १५०
उघड्यावर लघवी करणे २००
उघड्यावर शौच करणे ५००
पाळीव प्राण्यांनी घाण केल्यास १८०
नाले-नदी-तलाव-घाटावर कचरा टाकणे २००
कचरा जाळणा-यांकडून ५००