पुण्यातील कचरा व्यवस्थापनाचे परदेशी पाहुण्यांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 09:56 AM2023-05-04T09:56:38+5:302023-05-04T09:57:24+5:30
कचरा प्रकल्पातून सेंद्रिय खतनिर्मिती करून हे खत माफक दरात शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येते
पुणे : देवाची उरुळी व फुरसुंगी येथील कचरा डेपोमधील, प्रक्रिया प्रकल्प, कचरा कॅपिंग, बायोमायनिंग तसेच करण्यात आलेल्या वृक्षारोपण व पर्यावरण पूरक कामांची बुधवारी १८ परदेशी पाहुण्यांनी पाहणी करून या कामाचे कौतुक केले.
‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत देशातील विविध शहरात कचरा व्यवस्थापनासाठी अनेक प्रयोग सुरू आहेत. या दरम्यान कचरा व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी भारत भेटीवर आलेल्या परदेशातील १८ प्रतिनिधींमध्ये १४ प्रतिनिधी हे आफ्रिका खंडातील विविध देशांच्या तर आशिया खंडातील बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि भूतान येथील प्रत्येकी एका प्रतिनिधींचा समावेश होता.
दोन दिवसांच्या पुणे भेटीवर आलेल्या या प्रतिनिधींनी बुधवारी घरोघरी जाऊन ओला व सुका कचरा गोळा करणे, त्याची प्रक्रिया प्रकल्पांपर्यंत वाहतूक तसेच प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प आणि जुन्या साठलेल्या कचऱ्यावरील बायोमायनिंग प्रक्रिया, या प्रकल्पांतून होणारी सेंद्रिय खत निर्मितीची महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.
देवाची उरुळी व फुरसुंगी येथील ६५ एकर जागेवर असलेल्या या कचरा डेपोच्या जागेवर नव्याने कचरा टाकण्यात येत नसून, मागील अनेक वर्षांपासून साठवून ठेवलेल्या कचऱ्यावर भूमी ग्रीन कंपनीच्या माध्यमातून बायोमायनिंग प्रक्रिया करून भूभाग रिकामा करण्यात येत आहे. दरम्यान, २००२ पासून येथील उघड्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने कॅपिंग करून त्यावर बाग फुलविण्यात आली आहे. तसेच नुकतेच याठिकाणी २०० मे.टनांचा कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला असून, येथे सेंद्रिय खतनिर्मिती करून हे खत माफक दरात शेतीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर रिकाम्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले आहे.