कचराप्रश्न अद्याप पेटलेलाच
By Admin | Published: April 23, 2017 04:27 AM2017-04-23T04:27:30+5:302017-04-23T04:27:30+5:30
महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध
पुणे : महापौर, प्रभारी आयुक्त तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या आग्रहानंतरही उरुळी तसेच फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी पुण्यातील कचरा त्यांच्या गावामध्ये टाकण्यात असलेला विरोध कायम ठेवला. तुमचा कचरा तुमच्या शहरातच जिरवा, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे पुरस्कर्ते आहोत, असे त्यांनी या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
उरुळी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर हा विषय आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. कचरा टाकू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी तिथे आंदोलन सुरू केले आहे. कचरा घेऊन येणाऱ्या गाड्या ते परत पाठवीत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून महापौर मुक्ता टिळक यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांबरोबर शनिवारी बैठक घेण्यात आली. आमदार योगेश टिळेकर, उपमहापौर नवनाथ कांबळे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, घनकचरा विभागाचे सहआयुक्त सुरेश जगताप आदी बैठकीला उपस्थित होते.
कचरा डेपो हटाव समितीचे पदाधिकारी तात्या भाडळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, विजय भाडळे, संजय हरफळे, अमोल हरफळे, मच्छिंद्र कामठे, तसेच आबनावे व परिसरातील अनेक महिलांनी बैठकीत भाग घेतला व महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना तुमच्या पक्षानेच स्वच्छ भारत अभियानाची हाक दिली आहे, ती लक्षात ठेवून आमच्या आंदोलनात सहभागी व्हा, अशी विनंती केली. महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना तुमच्या गावातील अनेक विकासकामे महापालिका करीत आहे, ६६ कोटी रुपये त्यासाठी खर्च केला आहे, असे सांगितले व कचरा डेपो सुरू करू द्यावा, अशी मागणी केली. ग्रामस्थांनी त्याला ठाम नकार दिला.(प्रतिनिधी)
आरोग्य बिघडले : ग्रामस्थांचा आरोप
न्यायालायाने आदेश दिला आहे, म्हणून तुम्ही खर्च केला. कचरा डेपोमुळे गावाचे आरोग्य बिघडले आहे. या भागातील विहिरींचे पाणी खराब झाले आहे, त्यामुळे आम्हाला तुमच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. लहान मुलांना श्वसनाचे विकार झाले आहेत. वृद्ध व्यक्ती दम्याच्या शिकार झाल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. त्यामुळे आता कचरा टाकू देणार नाही, असे ग्रामस्थांनी निक्षून सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभा निवडणुकीत आम्हाला सत्ता द्या, ९ महिन्यांत डेपो बंद करतो, असे सांगितले, त्यावर विश्वास ठेवून डेपो सुरू करू दिला. मात्र सत्ता मिळाल्यानंतर आता २५ महिने झाले तरीही कोणी फिरकलेदेखील नाही. अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
जबाबदारी महापालिकेचीच
उरुळी व फुरसुंगी येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांना त्रास होत असेल तर त्यावर महापालिकेने उपाययोजना केली पाहिजे. ग्रामस्थांच्या भावना तीव्र दिसत आहेत. मात्र कचऱ्याचे करायचे काय, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. महापालिकेनेच यावर चर्चा करून तज्ज्ञांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवावा.
- चेतन तुपे,
विरोधी पक्षनेते, महापालिका
नक्की मार्ग निघेल
डेपोमध्ये फक्त ७०० टन कचरा टाकला जातो. त्यातील ५०० टन सुका कचरा शहरातच जिरवला जावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. काही प्रकल्पांची कार्यक्षमता वाढवत आहोत. बैठकीत तोडगा निघाला नाही, मात्र चर्चेची सुरुवात सकारात्मक झाली आहे.सोमवारी पुन्हा बैठक घेत आहोत.
- श्रीनाथ भिमाले, सभागृहनेते
प्रकल्प सुरू करणार
डेपोमध्ये कमीत कमी कचरा जावा असाच प्रयत्न आहे. नागरिकांना कसलाही त्रास होऊ नये, याचीही काळजी घेतली जाते. फक्त सुका कचरा व जो प्रकल्पांमध्ये घेतला जात नाही असाच कचरा डेपोत टाकला जातो. तोही शहरातच जिरावा यासाठी उपाययोजना करू
- सुरेश जगताप,
घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख
गावाचे आरोग्य बिघडले
शहराचा कचरा आमच्या इथे का, असा आमचा प्रश्न आहे. गावाचे सगळे आरोग्य या डेपोमुळे बिघडले आहे. सुधारणांसाठी पैसे खर्च केले असे सांगणेच चुकीचे आहे. हा खर्च केला नाही तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होईल. आमचे पाणी, शेती खराब होत आहे. आता हे थांबलेच पाहिजे. - भगवान पाडळे
-कचरा डेपो हटाव समिती