कचरा ट्रक पाहणारे कॅमेरेच चोरीला, दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:50 AM2018-02-13T03:50:48+5:302018-02-13T03:50:57+5:30
किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला असून, आधी चोरीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
पुणे : किती कचरा आला, किती गाड्यांमधून आला हे पाहण्यासाठी फुरसुंगी कचरा डेपो येथे बसवलेले महापालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरेच चोरीला गेले. त्याची काहीही चौकशी न करता महापालिकेने लगेचच दुस-या कॅमे-यांची निविदा जाहीर केली आहे. सजग नागरिक मंचाने त्याला विरोध केला असून, आधी चोरीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
उरुळी देवाची फुरसुंगी कचरा डेपो तसेच बाणेर कचरा डेपो येथे बसवण्यासाठी म्हणून महापालिकेने जानेवारी २०१७ मध्ये काही सीसीटीव्ही खरेदी केले. बाणेर येथील डेपो बारगळल्याने ते कॅमेरेही फुरसुंगी येथे बसवण्यात आले. एकूण २२ कॅमेरे बसवण्यात आले होते. आता फक्त ८ कॅमेरे शिल्लक आहेत. त्यातलेही ३ बंद अवस्थेत आहेत.
सजग नागरिक मंचाने कॅमेºयाने वर्षभरात कचरा चोरीला जात असल्याच्या किती घटना कॅमेºयात पकडण्यात आल्या याची माहिती मागितली. असे एकही प्रकरण घडलेले नाही. मुळातच शहरामधून जमा करून आणलेला हा कचरा चोरीला जाईल म्हणून तिथे काही लाख रुपये खर्च करून कॅमेरे बसवणे चुकीचे आहे.
चोरी झालेल्या कॅमेºयांची चौकशी न करता प्रशासनाने लगेचच कमी असलेल्या कॅमेºयांची संख्या वाढवण्यासाठी म्हणून निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यातही खुल्या बाजारातील याच कॅमेºयांची किंमत व महापालिकेने निविदेत नमूद केलेली किंंमत यात बरीच मोठी तफावत आहे, असे मंचाचे म्हणणे आहे.
ही निविदा प्रक्रिया थांबवावी, चोरीच्या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी मंचाचे विवेक वेलणकर व विश्वास सहस्रबुद्धे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.