शिवरायांच्या पुतळ्याभोवतालचा बगीचा गायब
By Admin | Published: February 16, 2015 11:32 PM2015-02-16T23:32:51+5:302015-02-16T23:32:51+5:30
शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे.
लेण्याद्री : छत्रपती शिवाजीमहाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर नगरपालिकेने उभारलेल्या शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी शहरातील शिवप्रेमी नागरिकांनी केली आहे.
शिवरायांचा पुतळा असलेल्या ट्राफिक आयलंडमधील बागबगीचा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. नगरपालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी शिवनेरीवर येत असतात. शिवनेरीकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या या पुतळ्यापाशी आवर्जून थांबून छायाचित्र काढली जातात. अशा वेळी या पुतळ्याच्या परिसराच्या विकासाबाबत नगरपालिका प्रशासन उदासीन असल्याने शिवप्रेमी नागरिकांमधून तीव्र संतापाची भावना आहे.
शिवनेरीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोरील चौकात नगरपालिकेने सन २००२ मध्ये छत्रपती शिवाजीमहाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. या पुतळ्याभोवती ट्राफिक आयलंड उभारून त्यात शोभेची झाडे, छोटा बगीचा करून सुशोभीकरण करण्यात आले होते. मागील तीन -चार वर्षांपासून देखभालीअभावी या बगीच्याची रया गेलेली होती. (वार्ताहर)
४वर्षभरापूर्वी नगरपालिकेच्या वतीने येथील बगीचा नव्याने तयार करण्यासाठी निविदा काढण्यात आलेली होती. परंतु बगीचा मात्र प्रत्यक्षात तयार करण्यात आलेलाच नव्हता. शिवरायांचा पुतळा उभारण्यात मोलाची भूमिका बजावणारे माजी नगराध्यक्ष विकास खोपे हे सध्या नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. पुतळा उभारण्याचे श्रेय घेण्यासाठी पुढे असलेले हे नगरसेवक मात्र आता पुतळा परिसराच्या सुशोभीकरणासाठी कोणताही पुढाकार घेत नाहीत.