उद्यानाचे झाले भकास माळरान
By admin | Published: May 7, 2017 03:16 AM2017-05-07T03:16:06+5:302017-05-07T03:16:06+5:30
मगरपट्टा चौकातील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाला पालिकेच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे.पालिका
लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : मगरपट्टा चौकातील डॉ. राममनोहर लोहिया उद्यानाला पालिकेच्या दुर्लक्षामुळे उतरती कळा लागली आहे.
पालिका प्रशासनाकडून या उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. पुरेशा पाण्याअभावी उद्यानाची अवस्था एखाद्या भकास माळरानाप्रमाणे झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बसविण्यात आलेली खेळणी तुटली आहेत. मनोरंजनासाठी असलेले कारंजे बंद आहे. जॉगिंंग ट्रॅक आणि स्वच्छतागृहाची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे लोहिया उद्यानात येणाऱ्या लहानग्यांसह मोठ्यांचाही हिरमोड होत आहे. सध्या सुटी असल्याने बच्चेकंपनीला तर खेळायला जावे कुठे, असा प्रश्न पडता आहे.
काही महिन्यांपूर्वीच उद्यानाची दुरुस्ती करण्यात आली होती. याशिवाय मल्टिपर्पज अशी खेळणीही बसविण्यात आली; मात्र त्यानंतर केवळ देखभाल आणि नियमित दुरुस्तीअभावी येथील साहित्याची अवस्था अत्यंत खराब आहे. सकाळी व संध्याकाळी उद्यानात चालण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच तरुण आणि महिला वर्गाची चांगली वर्दळ आहे; परंतु जॉगिंंग ट्रॅकची व्यवस्थित निगा राखली जात नाही. याशिवाय जॉगिंंग ट्रॅकवर कचरा येत आहे. काही ठिकाणी सिमेंटचे ब्लॉकही अस्ताव्यस्त पडले आहेत. पुरेशा पाण्याअभावी उद्यानातील लॉन पिवळी पडली आहे. अर्ध्या भागातील लॉन आणि झाडे पूर्णपणे झळून खाक झाली आहेत. त्यामुळे हे उद्यान आहे की माळरान, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नळ तुटले आहेत. बसण्याचे काही बाकडे तुटले आहेत.
जॉगिंंग ट्रॅकच्याच बाजूला असलेल्या स्वच्छतागृहाचे दरवाजे तुटले आहेत. नळही तुटले असून बाहेरील व आतील खालील फरशी खचली आहे.
कारंज्याच्या हौदाभोवती नाही जाळी
उद्यानात दोन कारंजी बसविण्यात आली आहेत; मात्र काही दिवस ती सुरळीत चालली. त्यानंतर एक कारंजे बंदच आहे. सध्या या कारंज्यात झाडांना पाणी देण्यासाठी पाणी साठविले जाते. मात्र, या कारंज्याच्या पाण्याच्या हौदाभोवती कोणतीही सुरक्षित जाळी नसल्याने लहान मुले हौदाकडे जाऊन पाण्यात पडण्याच्या धोका संभवत
आहे.
तुटलेल्या खेळणी दुरुस्तीसाठी पत्र दिले आहे. पुरेसे पाणी नसल्याने आणि ऊन जास्त असल्याने काही प्रमाणात झाडे सुकली आहेत. कारंज्याच्या हौदाकडे खेळणाऱ्या मुलांकडे लक्ष दिले जात आहे.
- बाबासाहेब चव्हाण,
उद्यान विभाग